पुणे : बागेत फिरण्याबरोबरच आता खेळ, कारंजाबरोबरच संगणक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्राचाही लाभ घेता येणार आहे. काही भागात तर आता शेतीही होणार आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हा उपक्रम सुरू केला असून, त्यासाठी सोसायट्यांनी अॅमेनिटी स्पेस म्हणून महापालिकेकडे हस्तांतर केलेल्या जागांचा वापर करण्यात येणार आहे.सोसायट्यांची; तसेच त्या परिसरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन, त्यांना हवे ते उपक्रमच यात सुरू करण्यात येतील. यापैकी बाणेर येथे २ व बिबवेवाडी, वडगाव शेरी येथे प्रत्येकी १, असे एकूण ४ पार्क तयार करण्यात आले आहेत. वडगाव शेरी येथे चर्चच्या समोर महापालिकेला २ हजार १६३ चौरस मीटरची जागा अॅमेनिटी स्पेस म्हणून मिळाली आहे. त्यावर सेंद्रिय शेतीचे प्रयोग करण्यात येणार आहे. नव्या कल्पनांना वाव त्यासाठीची प्राथमिक तयारी करून देणारे एक इनोव्हेशन सेंटरही या पार्कमध्ये असेल. शहरातील समस्येविषयी काही उपाययोजना करून दाखवायची असेल, तर त्यांना या सेंटरमध्ये मुक्त प्रवेश असेल. बिबवेवाडी येथे सर्व्हे क्रमांक ६८५मध्ये ५६४.१४ चौरस मीटरचा भूखंड महापालिकेला मिळाला आहे. तिथेही ई-लर्निंग सेंटर व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. रिकाम्या पडलेल्या भूखंडावर आकर्षक लॅण्ड स्केपिंग करून झाडे वगैरे लावण्यात आली आहेत. बाणेर येथे सर्व्हे क्रमांक १३५ मध्ये १ हजार ३०९ चौरस मीटर जागेवर, तर सर्व्हे क्रमांक १४० येथे १ हजार २२६ चौरस मीटरवर हे पार्क झाले आहेत. त्यापैकी एका पार्कमध्ये ई-लर्निंग केंद्र असेल.लहान व्यवसायांमधील कारागिरांना काम अधिक कुशलतेने कसे करायचे, याबाबत शिकवण्यात येईल. दुसऱ्या पार्कमध्ये ध्यानधारणा केंद्र असेल. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या कल्पनेतून पार्क आकार घेत आहेत. त्यासाठीचा खर्च महापालिका, तसेच स्मार्ट सिटी साठीच्या निधीतून होत आहे. बागेत प्रवेश करण्यासाठी शुल्क नसले, तरी सुविधा वापरण्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार आहे. खासगी संस्थांना ही केंद्रे चालविण्यासाठी देण्यात येणार असून, शुल्क आकारणीतून येणाऱ्या उत्पनातूनच त्यांनी केंद्रांचा खर्च करायचा आहे. (प्रतिनिधी)
मोकळ्या भूखंडावर होणार बागा
By admin | Published: April 27, 2017 5:14 AM