पुणे : सहकाऱ्यांकडून होणाऱ्या छळवणूकप्रकरणी विद्यार्थ्याने तक्रारी करूनही त्याची दखल न घेतल्याने प्राचार्यांविरुद्ध पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याचबरोबर तीन विद्यार्थ्यांवरही अॅँटीरॅगिंग कलमाअंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एमआयटी कॉलेज आॅफ पॉलीमर विभागाच्या परिसरात जुलै ते सप्टेंबर २०१४ दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी प्राचार्य ललितकुमार क्षीरसागर यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिबिशन रॅगिंग अॅक्ट कलम ७ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यश मिलन नाईक (वय १९, रा. शनिवार पेठ), निखिल भास्कर श्रीमल(वय २१, रा. धनकवडी) आणि तेजस सतीश मिरजकर (वय २१, रा. कोथरुड) यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिबिशन रॅगिंग अॅक्टप्रमाणे कलम ४ आणि ३४२, ३५५, ५०६, ३४ नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पॉलीमर विभागातील एका विद्यार्थ्यास वरील तीन विद्यार्थी सातत्याने त्रास देत होते. प्रयोगशाळेत रसायन टाकून त्याची दुर्गंधी घेण्यास लावणे, बाथरुमध्ये कोंडून ठेवणे, थुंकी चाटायला लावणे, पॅँट खाली ओढून कपडे कात्रीने फाडण्याची धमकी देणे अशा पद्धतीने त्याचा छळ केला जात होता. याबाबत संबंधित विद्यार्थ्याच्या आईने तक्रार दिली होती. मात्र, क्षीरसागर यांनी त्याची दखल घेतली नाही. संबंधित मुलाच्या पालकांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.
रॅगिंगप्रकरणी विद्यार्थ्यांसह प्राचार्यांवरही दोषारोपपत्र
By admin | Published: September 06, 2015 3:35 AM