पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (raghunath kuchik) यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 16 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 24 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर रघुनाथ कुचिक याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्याला जामीन देण्यात आला आहे. या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) आक्रमक झाल्या आहेत. पुण्यातील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणेपोलिसांवर गंभीर आरोप केलेत.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) हे आरोपीला मदत करत असल्याचा थेट आरोप चित्रा वाघ यांनी केला. 16 फेब्रुवारीला गुन्हा दाखल होऊनही पुणे पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळेच आरोपीला जामीन मिळवण्यासाठी वेळ मिळाला. अशाप्रकारे वेळकाढूपणा करून पोलिसांनी एकप्रकारे आरोपीला मदतच केली असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
यापूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या राज्यात गेले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. परंतु अशा प्रकारच्या राजकीय गुन्ह्यात मात्र पुणे पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. त्यामुळे जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.