पुणे - तमाशा ही महाराष्ट्राची ओळख आहे. तरीही तमाशाला विनाकारण बदनाम केले जाते. तमाशाने समाजाला खूपकाही दिले आहे. व्ही. शांताराम, कमलाकर तोरणे, अनंतराव माने यांनी तमाशाचे बीभत्स रूप चित्रपटांमधून दाखविले. ‘पिंजरा’ चित्रपटापासून तमाशाचा -हास सुरू झाला अशी टीका करीत महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी तमाशाच्या अधोगतीस चित्रपटालाच कारणीभूत ठरवले.क्रांतिज्योती पुणेच्या वतीने महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ‘लोकशाहीर गफूरभाई पुणेकर स्मृती गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार, शाहीर संभाजी भगत, पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा वैशाली चांदणे, गफूरभाई पुणेकर यांचे चिरंजीव शाहीर अमर पुणेकर उपस्थित होते. गफूरभार्इंच्या नावाने सुरू झालेल्या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरलो याचा आनंद आहे, मराठी कलावंत परिषदेच्या निमित्ताने दौऱ्यावर असताना माझ्या अनुपस्थितीत गफूरभाई काम पाहतील असे मी सांगितले होते. लोककलावंतांना मानधन सुरू करण्याचे श्रेय गफूरभार्इंना जाते. त्यांनी त्यासाठी १९ दिवस उपोषण केले होते. अशा शब्दांत खेडकर यांनी गफूरभाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, लोककलावंतांना अशा पुरस्कारांमधून सन्मान मिळायला हवा. त्यांचे कौतुक झाले पाहिजे यासाठी विविध संस्थांनी पुढे येणे आवश्यक आहे. तमाशातील कलावंत उपेक्षित आहेत. आज तमाशाला व्यावसायिक स्वरूप आले आहे. त्यात कालपरत्वे आम्ही विविध बदल घडवून आणले आहेत.उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. क्रांतिज्योतीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.काळाबरोबर परिवर्तन होत असते. कलेचा सन्मान होत असतो आणि कलेचे रूप बदलत असते. तमाशा हे असे लोकनाट्य आहे, की लोकांना हसवत ठेवण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. ही कला सोपी नाही. राजकारण्याकडे समाजाची दृष्टीदेखील चांगली नाही. मग कलेकडे कोणत्या दृष्टीने पाहिले जाते? हे आपल्याला करायचंय काय? कला ही कला असते.- उल्हास पवार
‘पिंजरा’ चित्रपटापासून तमाशाचा -हास - रघुवीर खेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:27 AM