पुणे : पुण्यात रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे १३ वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पवारांनी मिश्कील टिप्पणी करत राहुल देशपांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल देशपांडेने माझं निमंत्रण अद्याप स्वीकारलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
पवार म्हणाले, दिवाळीच्या निमित्ताने मी आयोजित करीत असलेल्या संगीत मैफलींना अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. पण राहुलने अद्यापही निमंत्रण स्वीकारलेले नाही. मुलीने आयोजित केलेल्या मैफलीला राहुल जातो, पण माझ्या निमंत्रणाचा त्याने स्वीकार केलेला नाही.
हे ऐकल्यावर पुणेकरांसह राहुलच्या चेहऱ्यावरही हास्यलकेर उमटली. संगीत, साहित्य आणि नाटकांचा व्यासंग असलेल्या पवारांनी गायक शंकर महादेवन यांच्या ‘सूर निरागस हो’ या गीतामध्ये आपला सूर मिसळला आणि ही शब्दसुरांची मैफल पुणेकरांसाठी अविस्मरणीय पर्वणी ठरली. गायक शंकर महादेवन यांनी आयुष्यात एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे मराठी मुलीशी लग्न. मराठी पत्नीमुळे त्यांना मराठी माणसाला कोणत्या प्रकारचे संगीत आवडते, मराठी माणसाची रुची काय ते कळले, असे पवारांनी मिश्किलपणे सांगितले.
पद्मविभूषण शरद पवार, पद्मश्री शंकर महादेवन आणि मी नुसताच श्री, अशी ओळख करून देऊन पाटील यांनी नेहमीच्या खुमासदार शैलीत फटकेबाजी केली. आता खरे तर अथश्री म्हणण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.