पुणे : ’फ्युजन’ ला विरोध केला जातो. पण, शंकर जयकिशन किंवा आर.डी बर्मन यांच्यासारख्या जुन्या संगीतकारांची गाणी किंवा सिंफनी ऐकली की त्यात वेगळं काहीच आढळणार नाही. त्यातही ‘फ्युजन’चं होतं. त्यामुळे ’फ्युजन’ पटत नाही, आम्हाला ते आवडत नाही असं म्हणणा-यांनाच गाणं कळत नाही, अशा शब्दांत ‘फ्युजन’ ला विरोध करणा-यांना प्रसिद्ध गायक युवा देशपांडे यांनी सुनावले.
राहुल देशपांडे यांना नुकताच ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. आज जेव्हा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा आजीची खूप आठवण येत आहे. आज ती असती, तर आपल्या नातवाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे बघून तिला नक्कीच तिला खूप आनंद झाला असता, अशी भावना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.
संगीत क्षेत्रात ‘फ्युजन’ बाबत विरूद्ध मतप्रवाह समोर येतात, त्याविषयी विचारले असता ‘फ्युजन’ हे नवीन असल्यासारखे भासते, पण ते नवीन नसते. जुन्या संगीतकारांनी देखील ‘फ्युजन’ चा वापर केला आहे. मात्र हेही तितकेच खरे आहे की आपण जेव्हा लतादीदी किंवा हदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांचे फ्युजन करतो, तेव्हा भान ठेवले पाहिजे. त्याचा विचका होऊ शकतो.
’रिएँलिटी शो’ मधील परीक्षकाच्या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले, सुरुवातीला माझ्यासाठी रिएँलिटी शो चे परीक्षक होणे अवघड झाले होते. माझा परीक्षण करताना काहीसा नकारात्मक सूर असायचा. पण हळूहळू स्वत:मध्ये बदल केला. रिअलिटी शोज मध्ये ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी ‘मोमेंट्स’ बनवावे लागतात. स्पर्धक हा अतिशय गरीब किंवा बंडखोर आहे, असे दाखवले जाते. मला काही गोष्टी पटल्या नाहीत. परंतु काही प्रमाणात क्रिएटिव्हलिबर्टीह्णमधून रिअलिटी शो बाहेर पडतील, तेव्हा त्याच्यामधून चांगली गाणी गायली जातील आणि ऐकलीही जातील.