पुणे: लोकसभा निवडणुकीत सध्या अनेक पक्ष आज आहेत. पण सध्या दोन गट तयार झाले आहेत. एकीकडे विश्व विख्यात नेते नरेंद्र मोदी यांच्या सोबत २४ पक्ष एकीने उभे आहेत. तर दुसरीकदे राहुल गांधी व त्यांच्या सोबतचे २४ पक्ष आहेत. पण ही आघाडी म्हणजे एक खिचडी असून, कोणीच कोणाला मानायला तयार नाही. अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा उद्यान, ताम्हाने चौक, बाणेर येथे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, राज्य सभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, गणेश बीडकर, धीरज घाटे, राजेश पांडे, स्थानिक माजी नगरसेवक, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, दत्तात्रय गायकवाड, प्रल्हाद सायकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा प्रश्न पडतो ही लोकसभा ची निवडणूक आहे की महापालिका का ग्रामपंचायतची. आघाडीकडे फक्त इंजिन आहे आणि त्यात केवळ एकाच ड्रायव्हरला बसायला जागा आहे. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया आणि प्रियांका, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया तर उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य यांनाच जागा आहे. पण सबका साथ सबका विकास म्हणत महायुतीच्या सर्व डब्यांना सोबत घेत मोदी विकासाच्या दिशेने निघाली आहे. एक मजबूत देश मोदींच्या नेतृत्वाखाली तयार होत आहे. अनेकांना माहिती आम्ही ४०० पार होणार आहे म्हणून मतदान करण्यास नाही गेले तरीही चालेल. पण असे न करता आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे असे आवाहनही त्यांनी केले.
आज विविध माध्यमातून दररोज सकाळी ९ वाजता एक भोंगा वाजतो. तो म्हणाला आम्ही ५ पंतप्रधान ५ वर्षात देऊ. पण ही निवडणूक काही त्यांच्यासाठी संगीत खुर्ची आहे का, अशी टीका फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता केली.