‘न्याय’ योजनेसाठी श्रीमंतांच्या खिशातून पैसा काढू : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 06:34 AM2019-04-06T06:34:08+5:302019-04-06T08:28:20+5:30

विद्यार्थ्यांशी साधला संवाद; गरिबांना ७२ हजार देणारच

Rahul Gandhi to get money from the pocket of rich people for 'justice' scheme: Rahul Gandhi | ‘न्याय’ योजनेसाठी श्रीमंतांच्या खिशातून पैसा काढू : राहुल गांधी

‘न्याय’ योजनेसाठी श्रीमंतांच्या खिशातून पैसा काढू : राहुल गांधी

Next

पुणे : ‘न्याय’ योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मध्यमवर्गीयांवर आर्थिक बोजा किंवा करवाढ करणार नसल्याचे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. देशात केवळ १५ जणांना मुबलक पैसा मिळत आहे. बँकिंग यंत्रणेवर दबाव असलेल्या या श्रीमंतांकडून योजनेसाठी पैसा वसूल केला जाईल. प्रत्येक गरिबाच्या खात्यात ७२ हजार रुपये जमा झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत तेजी येईल. आर्थिक अभ्यास करूनच ही योजना आणली असल्याचेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. तुमच्या कल्पनाच माझ्यासाठी मौल्यवान असल्याचे सुरुवातीला सांगत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. त्यानंतर जवळपास पाऊण तास गांधी आणि विद्यार्थ्य्यात संवाद रंगला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानने कार्यक्रम आयोजित केला होता. जाहीरनामा व न्याय योजनेविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर गांधी यांनी स्पष्ट केले की, हा जाहीरनामा फक्त काँग्रेसचा नाही. त्यासाठी विद्यार्थी, शेतकरी, तरुण, डॉक्टर्स अशा सर्व क्षेत्रातील हजारो लोकांशी संवाद साधला होता. त्यांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब त्यात आहे. ‘न्याय’ योजनेची कल्पनाही लोकांमधूनच आली आहे. मला पोकळ घोषणा द्यायला आवडत नाहीत. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या, अनिल अंबानी यांना कोट्यवधी रुपये कसे मिळतात? तीन लाख ५० हजार कोटी रुपये केवळ १५ श्रीमंत उद्योगपतींना देण्यात आले. किती विद्यार्थी व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले? ज्यांचा बँकिंग व्यवस्थेवर प्रभाव आहे, त्यांच्याकडून ‘न्याय’साठी पैसे येतील. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. ७२ हजार रुपये प्रत्येक गरीबाच्या खात्यात जमा झाल्यानंतर त्यांची खरेदीशक्ती वाढेल. त्यामुळे उत्पादन क्षेत्राला गती येईल. त्यातून अर्थव्यवस्था सुधारू लागेल, असा विश्वास खा. गांधी यांनी व्यक्त केला.


नोटबंदीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. नोटाबंदीची कल्पना विध्वंसक होती. नोटाबंदीमुळे अजूनही अर्थव्यवस्था सुधारली नाही. देशाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या. देशात सध्या दर २४ तासाला २७ हजार जणांच्या नोकºया जात आहेत. तर चीनमध्ये ५० हजार नोकºया निर्माण होत आहेत. आपल्याकडे कौशल्याला सन्मान मिळत नाही. क्षमतेनुसार काम मिळत नाही. त्यासाठी विद्यापीठे व औद्योगिक क्षेत्रामध्ये देवाणघेवाण होण्याची गरज आहे. निवडणुकांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गांधी यांनी आभासी जगातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. आरजे मलिष्का आणि अभिनेता सुबोध भावे यांनी सूत्रसंचालन केले.
आपल्याकडे प्रश्नांचा सन्मान केला जात नाही. शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी ऐकून घेतात. मी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. ते मला कोणताही प्रश्न विचारतात. त्यांचे काही प्रश्न माझ्यासाठी अडचणीचे असतात. मी त्याचे उत्तर देतो. माझ्यामध्ये तेवढे धाडस आहे. पंतप्रधान अशा कार्यक्रमांमध्ये का उभे राहत नाहीत. कारण त्यांना प्रश्न नको आहेत, असे म्हणत गांधी यांनी मोदींवर टीका केली. भविष्यात महिलांचे राजकारणातील स्थान काय असेल या विद्यार्थिनीच्या प्रश्नावर गांधी यांनी लोकसभा, राज्यसभा व विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या विद्यार्थिनीलाच ते गंमतीने म्हणाले, ‘तुम्हाला राजकारणाची आवड असेल तर माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला विधानसभा किंवा लोकसभेत जिथे तुम्हाला आवडेल तिथे संधी देईन. राजकारण आवडत नसेल तर मी ती आवड निर्माण करेन,’ गांधी यांच्या या प्रतिसादाला विद्यार्थ्यांनीही जोरदार दाद दिली.


एअर स्ट्राइकचे श्रेय हवाई दलालाच मिळाले पाहिजे. देशाने आपले सामर्थ्य दाखवून देणे गरजेचे आहे. मी कधीच त्याचे राजकारण केले नाही. माझा त्याला विरोध आहे. श्रेय घेण्यावर मी कधीच बोललो नाही. पंतप्रधान मोदी हे करत आहेत, अशी टीका गांधी यांनी केली.
एक अभिनेता म्हणून मी अनेकांचे बायोपिक केले आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनावरही बायोपिक केला आहे. मला अनेक लोकांनी सांगितले की, मी राहुल गांधी यांच्यासारखा दिसतो. मग मी विचार केला की, राहुल गांधी यांचा बायोपिक मी का करू नये? असे अभिनेता सुबोध भावे यांनी सांगताच त्यांनीही ‘मीही तुझ्यासारखा दिसतो’ असे म्हणत दाद दिली. यानंतर सुबोध भावे यांनी आपण एकमेकांवर बायोपिक करुया, असे म्हणताच, विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला. 

आय लव्ह मिस्टर मोदी!

प्रियांका गांधी व त्यांच्यातील नात्याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना गांधी यांनी प्रियांका ही माझी सर्वात जवळची मैत्रीण असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी यांना माझ्याविषयी राग, द्वेष आहे. पण मला त्यांच्याविषयी राग नाही. मी प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. ‘आय लव्ह मिस्टर मोदी’, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींविषयीच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी काही विद्यार्थ्यांनी ‘मोदी... मोदी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर गांधी यांनी काहीच हरकत नसल्याचे म्हटल्याने विद्यार्थ्यांनी लगेच घोषणा थांबविल्या.

साठीनंतर हवी निवृत्ती
राजकीय नेत्यांना निवृत्तीचे वय असावे का, या प्रश्नावर राहुल गांधी यांनी प्रतिप्रश्न करत किती वय असावे असे विचारले. मग त्यांनी ६० वर्ष हे निवृत्तीचे वय असावे असे सांगितले. त्यावर विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद देत ६० वर्षच राजकारणातून निवृत्त होण्याचे योग्य वय असल्याच्या त्यांच्या वक्तव्याला दाद दिली.

Web Title: Rahul Gandhi to get money from the pocket of rich people for 'justice' scheme: Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.