पुणे : पुणे, शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुण्यात ३ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. आरटीओ शेजारील एसएसपीएमएसच्या मैदानावर सांयकाळी चार वाजता ही सभा होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी, तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीत महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, पुण्यात रवींद्र धंगेकर, शिरूरमध्ये अमोल कोल्हे, मावळमध्ये संजोग वाघेरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी एलईडी स्क्रीन, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.
या सभेला महासचिव रवी चेन्नी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी ४० फूट गुणिले ३० फूट असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून तीस ते पस्तीस हजार नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव १० ते १२ हजार आसन क्षमता कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळून व्हीव्हीआयपींना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशद्वारासह एकूण तीन प्रवेशद्वारे ठेवण्यात आले असून ४ ठिकाणी एलईडी स्क्रिन उभारण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, बिस्कीट, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची पथके तैनात ठेवण्यात आल्याचेही काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.