गुजरातमधील पुलाबाबत राहुल गांधींची राजकारण न करण्याची भूमिका - जयंत पाटील
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: November 3, 2022 03:37 PM2022-11-03T15:37:56+5:302022-11-03T16:06:32+5:30
दोन विचारधारांमधील संस्कृतीतला फरक हीच खरी सभ्यता
पुणे : पश्चिम बंगालमध्ये पूल पडल्यावर त्याचे राजकारण करणारे देशाचे नेतृत्व त्यांच्याच गुजरातमध्ये पडलेल्या पुलाबाबत सोयीस्कर मौन बाळगतात. एवढेच नव्हे तर गुजरात पूल दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्यामुळे त्याविषयावर राजकारण न करण्याची भूमिका राहुल गांधी घेतात, हा दोन विचारधारांमधील संस्कृतीतला फरक आहे. हीच खरी सभ्यता असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. पुरंदर पब्लिसिटीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आयुष्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जयंत पाटील यांच्या हस्ते गुरूवारी पुण्यात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, राजकारणात सभ्यता राहिली नाही. पूर्वी असे होत नसे. कोणीही कोणाच्या कामात अडथळा आणत नसत. पण आज भाजपकडून कशावरही टीका होते. कलकत्ता येथे मागे एक पूल पडला होता. तेव्हा ममता ब‘नर्जी यांच्याविराधात भाजपच्या नेत्यांनी भयंकर टीका केली. तेव्हा हे अपेक्षित नव्हते. आता गुजरातमध्ये पूल पडला. तेव्हा मात्र विरोधक म्हणून राहुल गांधी यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले मी पूल पडण्यावर काही बोलणार नाही. ही खरी सभ्यता आहे.
ते अळमटळम करणारे नव्हेत
अळमटळम करणारे नेते हे अजितदादा नाहीत. ते काम होणार असेल तर हो बोलतात. एक घाव दोन तुकडे करतात. त्यांनी जलसंपदामंत्री असताना प्रचंड काम केले. पण त्यांच्यावर घोटाळा झाल्याची टीका केली. सिंचनामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आली. त्यावर कोणी बोलत नाही, अशी खंत जयंत पाटलांनी व्यक्त केलं.