पुणे : पुण्यात १३ मेला लोकसभेचे मतदान झाले. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे या रणधुमाळीत होते. येत्या ४ जूनला पुण्याचा खासदार ठरणार आहे. मतदानालाही दिलासादायक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यादरम्यान शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते. यावेळी वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर उपस्थित होते. त्यांनी दीड महिन्यातील अनुभव इडली चटणी, शिऱ्याचा आस्वाद घेत सांगितले. त्यावेळी धंगेकरांनी मी निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
ते म्ह्म्णाले, पुण्यात या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक वरीष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या. राहुल गांधींचीही सभा झाली. त्यांनी आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू असे मला सांगितले. मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढलो आहे. काही वेळेला विजय तर काही वेळा पराजय पाहवयास मिळाला आहे. पण त्याबरोबरच प्रत्येक निवडणुकीत मला काही ना काही शिकायला मिळाले. त्याप्रमाणे आताच्या निवडणुकीतही भरपूर काही शिकायला मिळाले.
...आणि त्यांनी भाजप नेत्यांना सुनावलं
माझ्या कुटुंबावर या निवडणुकीत टीका झाली. त्याचा मला प्रचंड त्रास झाला असून माझं कुटुंबही उध्वस्त होण्याची वेळ आली होती. मी याच उत्तर येत्या काळात निश्चितच देणार. सर्व प्रकारामुळे माझ वैयक्तिक आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. पण मी काही घाबरत नाही. मी काहीच घेऊन आलो नव्हतो आणि काही घेऊन जाणार नाही. मी काही पवारसाहेबाच्या किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांना नक्कीच उत्तर दिल जाईल असे सांगत भाजप नेत्यांना त्यांनी सुनावले.