पुणे: राहुल गांधी यांना यापूर्वीच मी सल्ला दिला आहे की, काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्या. विविध योजनांतून सामान्य नागरिक पक्षाशी जोडला जातो. पण यात्रेतून जोडला जात नाही, असा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. संपूर्ण देशात काँग्रेसची वाताहात झाली असून ही यात्रा आता महाराष्ट्रात येत असली तरी ती 'भारत जोडो' यात्रा नव्हे, तर 'पुढारी जोडो' यात्रा आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
पुण्यात विधानभवनात एका बैठकीसाठी ते आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सरसावले आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा नसून ती पुढारी जोडो यात्रा झाली आहे. त्यापेक्षा वेगळे महत्त्व त्याला राहिले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसची अवस्था कशी झाली हे पाहिले आहे. मंत्रीपदासाठी सत्तेत राहायचे. राज्याची आणि देशाची पातळीवर सारखीच अवस्था आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना आता कोणी गृहीत धरत नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही.”
गुजरातमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळेल असा दावा केला जात आहे, याबाबत ते म्हणाले, “गुजरातमध्ये निरंतरपणे भाजपची सत्ता राहिली आहे.देशात विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातकडे पाहिले जाते. नरेंद्र मोदी यांना जनाधार आहे. यंदाच्या गुजरातमधील निवडणुकांमध्ये सुद्धा जनता मोदी यांच्या पाठीशी असेल त्यात काही तिळमात्र शंका नाही.” तर राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळविले जात असल्याच्या टीकेला उत्तर देताना, उद्योगमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्वेतपत्रिका येऊ देत. त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल. विरोधकांनी टीकेचा सूर जो सुरु केला आहे सत्ता गेल्याचा वैफल्य आहे. त्यातून बेछूट आरोप सुरु आहेत. राज्याचे काम उत्तम सुरु आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.