पुणे : सावरकरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्याेत पेटवली. सावरकरांनी अंदमानला 12 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भाेगली. काळ्यापाण्याची शिक्षा काय असते हे राहुल गांधींना माहित नसेल. ते कधी अंदमानला गेलेही नसतील. राहुल गांधींनी अंदमानच्या काळ काेठडीत चार दिवस राहुन दाखवावं असं म्हणत भाजपाच्या आमदार तथा भाजपाच्या पुण्याच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुण्यातील सावरकर स्मारक येथे निषेध केला. यावेळी ''हाेय मी सावरकर'' असे लिहीलेले फलक यावेळी कार्यकर्त्यांनी हातात घेतले हाेते. राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घाेषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी बाेलताना मिसाळ म्हणाल्या, सावरकरांच्या नखाची सर सुद्धा राहुल गांधी यांना नाही. ते राहुल सावरकर हाेऊच शकत नाहीत. गांधी नाव असले तरी ते गांधीजींच्या विचारांवर चालू शकत नाहीत. सावरकरांनी तरुणांच्या ह्रदयात स्वातंत्र्याची ज्याेत लावली. स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी 12 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भाेगली. काळ्यापाण्याची शिक्षा काय असते हे राहुल गांधींना माहित नसेल. ते कधी अंदमानला गेलेही नसतील. राहुल गांधींनी अंदमानच्या काळ काेठडीत चार दिवस राहुन दाखवावं. काॅंग्रेस स्वातंत्र्यवीरांवर टीका करुन कुठल्या थराला गेली याचा काॅंग्रेसने विचार करावा. देशातील जनता काॅंग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेनेबाबत बाेलताना त्या म्हणाल्या, शिवसेना आता लेचीपेची झाली आहे. राहुल गांधीच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आधी ट्विट केलं आणि नंतर ते बदललं. राष्ट्रभिमान बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवला. हिंदुत्व टिकवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शेवटपर्यंत लढते. आता हिंदुत्वावर टीका हाेत असताना यावर शिवसेना गप्प बसत आहे.