लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इंग्लिश फलंदाज जॉनी बेअस्टोकडून दुसऱ्याच षटकात तुफान धुलाई झाल्यानंतरही भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने जोरदार कमबॅक करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यावर एल. के. राहुल म्हणतो की “अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर त्याने (प्रसिद्ध) मंगळवारी रात्री जे केले, त्याबद्दल मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. भारताकडून खेळणारा पुढचा कर्नाटकचा खेळाडू प्रसिद्धच असणार आहे यावर माझा नेहमीच विश्वास होता.”
इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका पुण्यात खेळली जात आहे. मालिकेतला पहिलाच सामना मंगळवारी (दि. २३) झाला. दुसरा सामना शुक्रवारी (दि. २६) खेळला जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुलने पत्रकारांशी व्हर्चुअल संवाद साधला. त्या वेळी तो बोलत होता. पहिल्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या चमकदार गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तत्पूर्वी के. एल. राहुलच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने तीनशे धावांचा टप्पा पार केला. हे दोघेही कर्नाटकातून येतात.
कोलकाता नाईट रायडर्सकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) नाव कमावणाऱ्या प्रसिद्धने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चार गडी बाद केले. या प्रसिद्धबद्दल राहुल म्हणाला की मी त्याला ज्युनिअर क्रिकेट खेळत असल्यापासून पाहिले आहे. नेटमध्येही तो आपल्या गोलंदाजीने लक्ष वेधून घेतो. वेगवान गोलंदाजी करण्याचे कौशल्य प्रसिद्धकडे आहे. राहुलच्या मते, “(तो) एक उंच, शिडशिडीत मुलगा आहे. विकेटमधून तो चांगला बाऊन्स मिळवतो. मुश्ताक अली किंवा विजय हजारे यासारख्या अंतर्देशीय स्पर्धांमध्ये काही मोसमात त्याच्याबरोबर काहीतरी खेळल्यानंतर मला जाणवले की तो धाडसी मुलगा आहे.”
“आपण पाहिले असेल की पहिल्या सामन्यात इंग्लिश फलंदाजांशी तो शाब्दिक चकमकही करत होता. त्याला चुरस आवडते. हीच त्याची गोष्ट मला आवडते. प्रसिद्ध परिश्रम करत राहिला तर भारतीय क्रिकेटसाठी तो मोलाचा ठरेल,” असा विश्वास राहुलने व्यक्त केला.
संघात येणाऱ्या तरुण खेळाडूंमध्ये आयपीएलमुळे प्रचंड आत्मविश्वास ठासून भरला आहे, असे राहुल म्हणाला. त्याने सांगितले की, भारतीय संघात येणाऱ्यांनी सलग दोन-तीन वर्षे आयपीएल तसेच इतर स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करुन हे खेळाडू राष्ट्रीय संघात येतात तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ते आतुर असतात. याच आयपीएलमध्ये अनेक इंग्लिश खेळाडू देखील खेळतात. सूर्या (सूर्यकुमार यादव), ईशान (किशन) आणि कृणाल (पांड्या) यांच्या मुलाखतींमध्ये तुम्ही ऐकले असेल की आयपीएलमध्ये यापैकी बऱ्याच जणांच्याविरुद्ध ते खेळले असल्याने त्यांचा गेम त्यांना माहीत आहे. आयपीएलमधला हाच आत्मविश्वास त्यांना देशासाठी खेळताना उपयोगी येतो.
“या तरुणांना ‘यंगस्टर्स’ म्हणणे विचित्र वाटते आहे, कारण वर्षानुवर्षे आम्ही त्यांचा खेळ पाहात आलोय. ते जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात तेव्हा वाटते की त्यांनी अशीच कामगिरी करत राहावे,” असेही राहुलने नमूद केले.
चौकट
राहुल म्हणतो
-भारतीय क्रिकेट संघात कोणीच स्वत:चे स्थान गृहीत धरु शकत नाही एवढी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे सतत प्रयत्न करत राहणे आणि संधी मिळेल तेव्हा त्याचा पुरेपूर फायदा उठवणे एवढेच हातात आहे.
-मी अपयशाचा फार विचार करत नाही. प्रयत्न करत राहतो. कठोर मेहनत घेतो. यश-अपयश खेळाचा भाग आहे. संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करायची याच ध्येयाने मी सराव करत राहिलो.
-पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ मिळतो. माझी फलंदाजी मी ओळखून आहे. खेळपट्टीवर थांबणे महत्त्वाचे. नंतर धावांचा वेग वाढवता येतो.
चौकट
‘बॅलन्स’ महत्त्वाचा
“मी आज जो काही आहे तो खेळामुळे आहे त्यामुळे खेळाप्रती गंभीर आहे. माझ्याकडे पाहून लोकांना वाटते की याच्याजवळ क्रिकेट ‘पॅशन’ नाही, हा फार ‘एक्सप्रेसिव्ह’ नाही. पण ते खरे नाही. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी बॅलन्स महत्त्वाचा. तो राखण्याचा माझा प्रयत्न असतो. स्वत:वर जेवढा विश्वास दाखवेन तेवढा मी चांगला खेळेन.” -के. एल. राहुल.