पिंपरी : उद्योगमंत्री उदय सामंत गुरूवारी (दि. २२) पिंपरी-चिंचवड महापालिकेत आले होते. यावेळी माजी गटनेते राहुल कलाटे यांनी उद्योगमंत्री सामंत यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. चिंचवड मतदार संघातील शिवसेनेसह भाजपचे कार्यकर्तेही यामुळे अस्वस्थ झाले आहेत. मात्र, ही भेट सार्वजनिक असल्याचे सांगत राहुल कलाटे यांनी यावर पडदा टाकला.
पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून राहुल कलाटे यांची ओळख आहे. सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील काही आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी हे त्यांच्या पाठीशी कायम असल्याचे दिसून आले. कलाटे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात यावे, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राहुल कलाटे सध्या पक्ष प्रवेशासाठी सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. गेली १० वर्षे राहुल कलाटे यांनी चिंचवड मतदार संघातून अपक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. ‘मविआ’च्या नेत्यांनी मध्यस्थी करूनही चिंचवडमधून विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षाच्या गटनेतेपदी राहुल कलाटे यांची निवड झाली होती.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात अन् माझ्यात जुनी मैत्री आहे. त्यामुळे वैयक्तिक न भेटता सार्वजनिक ठिकाणी आम्ही भेटलो आहे. पक्षप्रवेश करण्यासाठी ही भेट नव्हती. त्यामुळे कोणीही याला राजकीय रंग देऊ नये.
- राहुल कलाटे, माजी नगरसेवक