पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी (दि. ३०) होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दौंडचे भाजपचे आमदार राहुल कूल व मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत २१ पैकी १८ आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे कूल आणि शेळके यांच्या निवडीमुळे जिल्हा नियोजन समितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. तर शिंदे गटाला वगळण्यात आल्याचे चित्र समोर उभे राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत संपल्याने सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक राज्य सुरू आहे. पुणे व पिंपरी महापालिकांवरही प्रशासकराज सुरू असल्याने जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री म्हणून अजित पवार हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य म्हणून व जिल्हा नियोजन अधिकारी हे संयोजक म्हणून कार्यरत आहेत. समितीच्या अधिनियमानुसार जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार किंवा खासदार यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येते. हे नामनिर्देशित सदस्य दोनपेक्षा जास्त नसतात.
त्यानुसार राज्य सरकारने बुधवारी (दि. २९) या दोन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली आहे. यावर दोन्ही आमदारांनाच संधी देण्यात आली आहे. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कूल व मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके यांना सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे. जिल्ह्यात चार खासदार असून, महायुतीचे पुण्यातील भाजपचे मुरलीधर मोहोळ हे सध्या केंद्रीय मंत्री असून, मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडून आले आहेत, तर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आहेत. तसेच जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत २१ पैकी १८ आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन सदस्यांच्या नियुक्तीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच प्रभाव असल्याचे दिसून येत आहे.