पुणे : कोणाच्या हातात विधात्याने कलेच्या मार्गाने रंग भरून ठेवले असतील हे आपणही सांगू शकत नाही. याच ओळीला सार्थ ठरणाऱ्या पुण्याच्या राहुल लोहकरेकडे बघितले की अचंबित व्हायला होत आहे. या कलाकाराने एक दोन नव्हे तर तब्ब्ल १०० कलाकृती काचेवर साकारल्या आहेत. त्यातही १०० वी कलाकृती असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रणाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. राहुल गेली १४ वर्षं स्टेन्ड ग्लासच्या माध्यमातून अनोख्या कलाकृती साकारत आहेत. काचेवरील कलाकुसरीच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांवर प्रतिमा साकारल्या आहेत.
सिंहगड रास्ता विठ्ठलवाडी येथे राहणारे राहुल केवळ तीन मिलिमीटर जाडीच्या स्टेन ग्लास हातानं कापून तो देवतांच्या प्रतिमा साकारतात. हे काम खूप चिकाटीचं, किचकट, वेळखाऊ आणि काचेचं असल्यानं धोकादायकही आहे. हे फक्त काचेवरील पेंटिंग नाही. विविध रंगी आणि विविध पोत ( टॆक्सश्चर्स ) असलेल्या इंपोर्टेड काचा वापरून या माध्यमातून प्रतिमा निर्मिती केली जाते. हे काम हाताने काचा कापून केले जाते. सर्व कापलेल्या काचांना आधी कॉपर टेप लावली जाते व नंतर शिसे (लेड) वितळवून त्याने सर्व काचा जोडल्या जातात. त्यातील चेहरा, दागिने असे काही भाग पारदर्शक रंग वापरून रंगवले जातात. पाठीमागून प्रकाशमान होईल अशा फ्रेममध्ये ही प्रतिमा बसवली जाते.
आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असूनही त्यांनी ही कला आवडीनं जोपासली आहे . “शिवराज्याभिषेक’ ही त्यांची शंभरावी प्रतिमा असून तिचा आकार चार फूट बाय सहा फूट इतका आहे. या प्रतिमेत त्यांनी 8 एलईडी ट्यूब बसविल्या असून केशरी, लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि गुलाबी रंगाची काच वापरली आहे. पारदर्शक आणि अपारदर्शक अशा दोन्ही प्रकारच्या काचा वापरून शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही देखणी काच प्रतिमा त्यांनी तयार केली आहे. राहुल यांनी याबाबत बोलताना यासाठी आईचा आशीर्वाद, परमेश्वराची कृपा मी फक्त निमित्तमात्र असल्याचेच सांगितले. कला की आपल्यात असतेच पण तिला जोपासायची संधी मिळायला हवी असेही त्यांनी सांगितले.