पुणे : ‘आमच्याबरोबर बोला’ हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा हट्ट पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुरवला. मुक्काम केलेल्या हॉटेलच्याच सभागृहात त्यांनी निवडक ४० ते ५० कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याबरोबर संवाद साधला. काँग्रेसचा जाहीरनामा लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवा असे त्यांनी सांगितले व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना पुण्याच्या जागेकडे नीट लक्ष द्या अशी सूचनाही केली.
दोन्ही चव्हाणांसह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेस आघाडीचे पुणे लोकसभातील उमेदवार मोहन जोशी व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गांधी म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा अर्थतज्ज्ञांबरोबर चर्चा करून, त्यांच्या सूचनांचा समावेश करून तयार केला आहे. वर्षाला ७२ हजार रुपये ही फक्त घोषणा नाही तर त्यामागे अभ्यास आहे. त्यातील सर्वच मुद्दे पदाधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत पोहचवले पाहिजेत. बºयाचदा त्याकडे दुर्लक्ष होते, तसे करू नका, जनतेच्या शंका असतील तर त्याचे निरसन करा, असे आवाहन गांधी यांनी केले.बारामती, मावळ, शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनुक्रमे सुप्रिया सुळे, पार्थ पवार व डॉ. अमोल कोल्हे यांनीही राहुल यांची हॉटेलच्या खोलीत भेट घेतली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे त्यांच्यासमवेत होते. राहुल यांनी तिघांनाहीशुभेच्छा दिल्या.