बारामती : मंद उजेड ठेवुन स्त्री पुरुषांची रंगविलेली अश्लील छायाचित्रे लावणाऱ्या कॅफेचालकावर बारामती शहर पोलीसांनी गुरुवारी(दि ५) सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. याप्रकरणी दोघा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कॅफेमध्ये केवळ बसण्यासाठी ५० रुपये प्रतितास भाडे आकारले जात असल्याचे भिंतीवर लिहिण्यात आले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या गेट समोर असणाऱ्या दिगंबर प्लाझा या इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या हिडन कॉफी शॉपवर पोलिसांनी कारवाई केली आहे. महाविद्यालयात शहरातून तसेच आसपासच्या अनेक गावातून विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शिकण्यासाठी येतात .मात्र मागील दोन महिन्यांपासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या दिगंबर प्लाझा या इमारतीच्या तळमजल्यावर गाळा नं ११ मध्ये कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे चालत असल्याची पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुरवातीला पोलिसांनी पाहणी केली .यावेळी कॉफी शॉपमध्ये जाणीवपूर्वक मंद उजेड असणारे विद्युतदिवे लावल्याचे आढळले. या कॉफी शॉप मधील भिंतीवर स्त्री पुरुषांचे चुंबन घेतानाचे अश्लील पोस्टर चिटकवले आहेत. तसेच येथे मोठ्या आवाजात अश्लील गाणी लावली जात होती. येथील भिंतीवर एक तास बसल्यास ५० रुपये चार्ज पडेल, असे लिहिले आहे. या सगळ्या प्रकाराचा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मानसिक त्रास होत असे. याबाबत पोलीस हवालदार विजय सोपान वाघमोडे यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईमध्ये चालक राकेश उर्फ बिट्या गणेश गायकवाड याला अटक केली आहे. मालक तानाजी बाबुराव चौगुले फरार आहे. या दोघांवर विद्यार्थी विद्यार्थिनींना मानसिक त्रास देणे , अश्लील कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करणे प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,पोलीस उपनिरीक्षक वाय. ऐ.शेलार, पो. कॉ. सिद्धेश पाटील, राजेश गायकवाड, योगेश कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. तसेच पुढील तपास संदिपान माळी करीत आहेत.———————————
मंद उजेड ठेवुन स्त्री पुरुषांची अश्लील छायाचित्रे लावणाऱ्या कॅफे चालकावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 9:51 PM
कॅफेमध्ये केवळ बसण्यासाठी आकारले जात होते ५० रुपये प्रतितास भाडे ?
ठळक मुद्देबारामती शहर पोलिसांची कारवाई