पुणे : नामवंत कंपनीच्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरुन त्या विक्रीसाठी पाठविणा-या हडपसर इंडस्ट्रीमधील डेल्टा डिस्टिलरिजच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या कारखान्यातून ६० लाख ८४ हजार ८१० रुपये किंमतीच्या एकूण १ लाख २९ हजार ७५० बाटल्या जप्त केल्या आहेत.
डेल्टा डिस्टिलरिजचे मॅनेजर ललित विश्वनाथ खाडीलकर (वय ५१, रा. शनिवार पेठ), सुपरवायझर रवींद्र रामकृष्ण तायडे (वय ४६, रा. गंगानगर, फुरसुंगी) आणि अकाऊंटंट सुनिल रघुनाथ इंगळे (वय ४२, रा़ शिवाई गार्डन, सुरक्षानगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. डेल्टा डिस्टिलरिज या कंपनीचे मालक प्रसाद बळीराम हिरे (रा. मुंबई) आणि फायनान्सियल कंट्रोलर लक्ष्मण कन्हैयालाल तिडवाणी (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथे डेल्टा डिस्टिलरिज ही कंपनी आहे. या कंपनीच्या कारखान्यात युनायटेड स्पिरिट या कंपनीच्या बाटल्या गोळा करुन त्यात बनावट दारू भरली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना मिळाली. याबाबत त्यांनी हरियानातील कंपनीकडे चौकशी केली. त्यांनी अशी कोणतीही परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर युनिट ५ च्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. त्यात युएसएल या कंपनीचा रजिर्स्टड शिक्का असलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरले जात होते. अशा ६० लाख ८४ हजार ८१० रुपये किंमतीच्या भरलेल्या ५९ हजार ७६० बाटल्या आणि १ लाख २९ हजार ७५० रिकाम्या बाटल्या मिळाल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या असून तिघांना अटक केली आहे.