सांगवी: बारामती तालुक्यातील सांगवी येथे बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत केला आहे. विविध कलमाअन्वये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद गौतम लोखंडे यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सांगवी येथे रानात बाभळीच्या झाडाखाली आडोशाला पत्त्याचा डाव चांगलाच रंगला होता. त्यानंतर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपी अनिल उर्फ आनंदा संभाजी जगताप रा.सांगवी ( ता.बारामती जि.पुणे ), अमोल दादासो माने ( वय २६, रा.सांगवी ), विशाल अशोक पवार (वय ३४, रा.फलटण ), अशोक शंकर जगताप (रा.सांगवी),सनी तानाजी पोंदकुले ( रा.शिरवली ),बाळासो नंदकुमार बागाव ( रा.शिरवली ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान रोख दीड हजार रुपयांची रक्कम, पत्तेचे चार कॅट, ७५ हजारांच्या दोन मोटारसायकल असा एकूण ७६ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कोरोना साथीचा रोग संसर्ग चालू असताना जिल्हा अधिकारी यांनी सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तरी देखील एकत्र येऊन संसर्ग वाढण्याची भिती असताना देखील जुगार अड्डा सुरू ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळता जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करून विना परवाना बेकायदेशीर पैशे लावुन जुगार अड्ड्यावर वरील सर्वजण पत्ते जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक हे अधिक तपास करत आहे.