भिगवण: भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी नागरिकांना ताब्यात घेतले. यात शासकीय नोकराबरोबर राजकीय पदाधिकारी , नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत निंबोडी रस्त्यावर असणाऱ्या डोंगराजवळ हा अड्डा चालवला जात असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकत हि कारवाई केली. त्यामध्ये ८ टेबलावर खेळवल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. यावेळी अड्डा चालक हनुमंत माणिक थोरात यांच्या सह २६ जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस कारवाई होण्याच्या भीतीने अनेक वेळा जागा बदल करून हा जुगार अड्डा चालवला जात होता. रिमझिम पाऊस चालू असताना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने या ठिकाणी प्रवेश करत अड्ड्यावर छापा घातल्याने जुगाऱ्यांच्या पळून जाण्याच्या प्रयत्नावर विरंजन पडले.
राजकीय नेते आणि शासकीय कर्मचारी एकालाही सोडणार नसल्याचा पोलिसांचा इशारा
सदर कारवाईत अनेक राजकीय नेत्यांबरोबर शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्यासह बारामती परिसारातील नामांकित वस्ताद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तर आपले नाव जुगाऱ्याच्या यादीतून काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही पोलिसांनी कारवाईत कोणालाही सोडणार नसल्याची माहिती दिली. त्यामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, कर्जत, फलटण, माळशिरस अशा ६ तालुक्यातील २६ जुगारी खेळत होते. सदरची कारवाई भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.