लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भवानी पेठेतील कासेवाडीत एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोकड व जुगाराचे साहित्य असा २ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेवाडीत अन्वय युसूफ खान (वय ५६, रा. भवानी पेठ) हा तीन पत्ती जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी जुगार खेळताना २३ जण आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी हवालदार दत्तात्रय मच्छिंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईमुळे जुगारवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करुन ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.