दुधउत्पादक शेतकºयावर पथकाची धाड
लाकडी येथील घटना : वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : लाकडी (ता. इंदापूर) येथील दूधभेसळ करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यावर जुलै महिन्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने धाड टाकण्यात आली होती. या वेळी दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. याचा अहवाल गुरुवारी आला असून त्यात भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली. राजाराम मधुकर खाडे (रा. घर गट नं. २९१ खाडेवस्ती, पो. लाकडी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने २९ जुलैला दक्षता विभागाच्या गोपनीय माहितीच्या आधारे खाडे यांच्या दूध व्यवसायावर धाड टाकली. या ठिकाणी गायीच्या दुधामध्ये व्हे पावडर व लिक्विड पॅराफीन हे अपमिश्रके टाकून भेसळ होत असल्याचे आढळले. यावेळी ११८ लिटर भेसळयुक्त दुध जप्त करून नष्ट करण्यात आले. व्हे पावडर (गोवर्धन) व लिक्वीड पॅराफीन हे अपमिश्रके २७६ किलो रुपये ३१ हजार ९८८ किंमतीचा माल जप्त करण्यात आला होता.
त्याचा गाय दुधाचा विश्लेषण अहवाल गुरुवारी (दि २४) प्राप्त झाला. त्यामध्ये मिनरल आॅईल (नॉन फूड ग्रेड पॅराफीन ) व स्किम्ड मिल्क पावडर इत्यादींची भेसळ आढळून आली. या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी सुलिंद्र क्षीरसागर यानी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.