इंदापूर (पुणे) : बावडा दुरक्षेत्र हद्दीतील बेकायदा हातभट्टी दारु विक्रीच्या अड्ड्यांवर आज (दि. १) छापा मारुन इंदापूरपोलिसांनी २ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशानुसार बावडा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के.बी. शिंदे, महिला पोलीस हवालदार शुभांगी खंडागळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, लखन साळवी, पोलीस शिपाई विकास राखुंडे, विनोद काळे, समाधान केसकर यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. जप्त केलेल्या मुद्देमालात मानवी शरीरास अपायकारक अशा रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे ३ बॅरल, १२ दोनशे लिटरचे नग, १ शंभर लिटरचा नग व इतर साहित्याचा समावेश आहे.
आगामी काळात येणारे होळी, ग्रामदैवतांच्या यात्रा, जयंतीचे उत्सव आदि सण व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस यांच्याकडून अवैध धंद्यावर धाडी टाकून धडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी पत्रकारांना दिली.