पुणे : सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’च्या सामन्यांवर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील १० जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी छापा मारून पकडले. पोलिसांनी दहा जणांना अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. १३) रात्री कोथरूड भागातील उच्चभ्रू अशा उजवी भुसार कॉलनी परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुकेशकुमार शैलेंद्रप्रसाद साहू (२४), देवेंद्र कमलेशकुमार यादव (२१), राहुलकुमार गणेश यादव, रोहितकुमार गणेश यादव (२६), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (२३), संदीप राजू मेश्राम (२१), आखिलेश रूपाराम ठाकूर (२४), मोहम्मद ममनून ईस्माईल सौदागर (३२), अमित कैलास शेंडगे (३१, सर्व रा. छत्तीसगड), जसवंत भूषणलाल साहू (२२) यांच्यावर फसवणुकीसह जुगार प्रतिबंध कायदा, भारतीय टेलीग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत सहायक पोलिस फौजदार प्रवीण वसंत ढमाळ (५३) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक १चे अधिकारी व कर्मचारी कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, उजवी भुसारी कॉलनीतील पटेल टेरेस या बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. एस-५ येथे आयपीएल क्रिकेटवर ऑनलाइन सट्टा खेळत व खेळवला जात आहे. मिळालेल्या माहिती खात्री करून पथकाने याठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी आरोपी त्यांच्या मोबाइलमध्ये वेबसाईटचा वापर करून ऑनलाइन जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. आरोपी स्वत:च्या फायद्यासाठी लोकांची फसवणूक करून ऑनलाइन क्रिकेट व इतर सट्टा खेळत व खेळवत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींकडून मोबाइल आणि लॅपटॉप, असा २ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत.