पुणे : बुधवार पेठ येथील वेश्या वस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी महिलांसह सात जणांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. पोलिसांनी एका कुंटणखान्यावर छापा टाकून अल्पवयीन बांगलादेशी मुलींना ताब्यात घेतले. गेल्या दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्या वस्तीतून बांगलादेशी महिलांसह एकूण १९ जणांना पकडले होते.
बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत काही बांगलादेशी महिला व त्यांचे साथीदार बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा मारत ५ बांगलादेशी महिलांसह सात जणांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान कुंटणखान्यात बांगलादेशी अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या मुलींची कुंटणखान्यातून सुटका केली, तसेच बांगलादेशी महिला आणि नागरिकांकडे कोणतेही भारतीय असल्याची कागदपत्रे नसल्याचे तपासात उघड झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या ५ बांगलादेशी महिला या वेश्या व्यवसाय करत होत्या, तर त्यांच्या सोबत असणारे पुरुष अन्य व्यवसाय करत होते.
बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सात बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी पारपत्र अधिनियम, तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमांन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याप्रकरणी ३ दलालांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.