पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ४ विशेष पथकाने गुरुवारी सकाळीच डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ ठिकाणी छापे घालून गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे. जंगली महाराज रोडवरील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. आतापर्यंत ३५९ ठेवीदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी दिवसभरात ६९ ठेवीदारांनी तक्रारी दिल्या असून त्यांची ६ कोटी ४७ लाख २७ हजार ८८४ रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत किमान २० कोटी रुपयांच्या तक्रारी आल्या असाव्यात असा अंदाज आहे.डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर १ नोव्हेंबरपासून पोलिसांकडे ठेवीदारांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहे. १ नोव्हेंबरपर्यंत ४१ जणांनी ४ कोटी ७४ लाख ५९ हजार ६०९ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. १ नोव्हेंबरला २३९ तक्रारी दाखल झाल्या. बुधवारी २ नोव्हेंबरला ६९ तक्रारी आल्या असून, त्यात फसवणूक झालेली रक्कम ६ कोटी ४७ लाख २७ हजार रुपये आहे. हे पाहता पोलिसांकडे आलेल्या ३४९ तक्रारीमधील रक्कम जवळपास २० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.या गुन्ह्याची व्यापी लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने तपासासाठी ४ विशेष पथकाची स्थापना करुन गुरुवारी सकाळीच डी. एस. कुलकर्णी यांचे जंगली महाराज रोडवरील कार्यालय, चतु:श्रृंगी येथील घर आणि त्यांचा मुलगा शिरीष यांचे टॅम्प टॉवर येथील फ्लॅट तसेच मुंबईतील कार्यालय याठिकाणी एकाच वेळी छापे घातले. त्या ठिकाणाहून अनेक महत्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. जंगली महाराज रोडवरील कार्यालयात सकाळी छापा पडल्याचे समजताच ठेवीदारांनी या ठिकाणी गर्दी केली होती. पण, पोलिसांनी कोणालाही कार्यालयात येऊ देण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे रस्त्यावरच उभे राहून आत नेमके काय चालले आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न ते करत होते. या कार्यालयातील कागदपत्राची तपासणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या देखरेखीखाली एक विशेष तपास कक्ष तयार करण्यात आला आहे. गुन्ह्याचा त्वरित तपास व्हावा यासाठी त्यात ५ पोलीस निरीक्षक, ४ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व २० पोलीस कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या तपास पथकाला तज्ञांचे मार्गदर्शन व्हावे, म्हणून त्यात सहायक सरकारी वकील, निवृत्त शासकीय लेखा परिक्षक, फॉरेसिक आॅडिटर यांचाही समावेश करण्यात आला आहे.तक्रारदारांसाठी स्वतंत्र फार्मसंगम पुलाजवळील आर्थिक गुन्हे शाखेत त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. येणा-या तक्रारदारांचा ओघ आणि त्यातील बहुसंख्य ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना तक्रार कशी द्यावी, याची काहीही माहिती नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तक्रारदारांसाठी पोलिसांनी एक स्वतंत्र फार्म तयार केला आहे. त्यात त्यांनी ठेवीची मुदत, ठेव रक्कम, त्यावरील व्याज, याची माहिती भरून द्यायची आहे. या गुन्ह्यात बळी ठरलेल्या नागरिकांना मदत व्हावी म्हणून सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संगम पुलाजवळील कार्यालयात त्यांच्या तक्रारी घेण्यात येणार असून तेथे हेल्पलाईनही (०२०-२५५४००७७) सुरू करण्यात आली आहे.फसवणूक झालेल्या नागरिकांना गुन्ह्याच्या तपासाबाबत अद्ययावत माहिती मिळावी व त्यांनी अफवांना बळी पडू नये, म्हणून त्यांचे व्हॉटसअप ग्रुप बनवून त्यावर नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या संगम पुलाजवळील कार्यालयात तक्रारदारांची बैठक घेऊन त्यांना गुन्ह्याचे तपासाचे प्रगतीबाबत माहिती देण्यात येऊन शंका निरसन केले जाणार आहे.गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर हे करत आहेत.६० लाखांपर्यंत गुंतवणूकडी. एस. कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांना मोठी स्वप्ने दाखविली. त्यामुळे अनेकांनी आपली पुंजी सुरक्षित राहील, या हिशेबाने मोठ्या प्रमाणावर डीएसके उद्योगसमूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मुदत ठेवींमध्ये ठेवी ठेवल्या आहेत. अगदी ६० लाख व त्याहून मोठ्या रकमेच्या मुदत ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. अनेकांच्या ठेवी या ४० लाख, ३२ लाख, २० लाख, १२ लाख अशा मोठ्या रकमेच्या असून काहींच्या २५ हजार रुपयांपर्यंतच्याही ठेवी असल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी आपली सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमा या कंपनीत गुंतविल्या आहेत.
डीएसके यांच्या पुणे, मुंबई कार्यालयावर छापे, तपासासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2017 10:35 PM