पुणे : कर्जत व लोणावळादरम्यान सोमवारी पहाटे रुळावरून मालगाडी घसरल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वेवाहतुक ठप्प झाली. त्यामुळे डेक्कन क्वीन, प्रगती यांसह सकाळी पुण्यातून मुंबईकडे धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. परिणामी, पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची ससेहोलपट झाली. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांनी एसटी बसकडे मोर्चा वळविला. पण अचानक दुप्पट गर्दी वाढल्याने एसटी प्रशासनाची तारांबळ उडाली. काही दिवसांपुर्वीच कर्जत ते लोणावळादरम्यान एक मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. पुन्हा सोमवारी पहाटे ठाकुरवाडी घाट परिसरात मालगाडी घसरली. या घटनेमुळे रेल्वेमार्ग उखडल्याने वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली. मालगाडी बाजुला करणे आणि रेल्वेमार्ग दुरूस्त करण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने रेल्वे प्रशासनाने मुंबई ते पुणेदरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन एक्सप्रेस या गाड्या रद्द कराव्या लागल्याने सकाळपासून रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. प्रामुख्याने सकाळी डेक्कन क्वीन व प्रगती एक्सप्रेसने मुंबईला जाणाऱ्या नियमित प्रवाशांची मोठी गर्दी असते. पण गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना एसटी बसचा पर्याय निवडावा लागला. पण नियमित प्रवाशांच्या तुलनेत दुप्पट गर्दी वाढल्याने पुणे एसटी बसस्थानकातील नियोजनही कोलमडू लागले. प्रवाशांची व्यवस्था करण्यासाठी शिवनेरी व शिवशाही बससह अन्य जादा गाड्याही मुंबईच्या दिशेने सोडाव्या लागल्या. -------------------सोमवारी रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या -- पुणे-मुबंई डेक्कन क्वीन- पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस- पुणे -मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस- पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेस- पुणे-सोलापुर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस- मुंबई-पुणे डेक्कन क्वीन- मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस- मुंबई -पुणे इंद्रायणी एक्सप्रेस- मुंबई - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस- मुंबई - पुणे डेक्कन एक्सप्रेस- भुसावळ- पुणे एक्सप्रेस - पुणे-भुसावळ एक्सप्रेस- पुणे-पनवेल पॅसेंजर- पनवेल-पुणे पॅसेंजर- -----------सोमवारी अंशत: रद्द केलेल्या रेल्वेगाड्या- संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस (पनवेल ते पुणेदरम्यान)- हुजुर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस (पुणे ते पनवेलदरम्यान)- पनवेल ते हजुर साहिब नांदेड एक्सप्रेस (पनवेल ते पुणेदरम्यान)- मुंबई - कोल्हापुर कोयना एक्सप्रेस (मुंबई ते पुणेदरम्यान)- कोल्हापुर ते मुंबई कोयना एक्सप्रेस (पुणे ते मुंबईदरम्यान)-------------------