पुणे : मुंबईत सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच मंकी हिलजवळ दरड कोसळल्याने पुणे ते मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारी ठप्प झाली. त्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले. काही गाड्यांना विविध स्थानकांवर थांबवून ठेवाव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. दरम्यान, सोमवारीही काही गाड्या रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबईत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे संपूर्ण रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या पावसाने सर्व रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सायंकाळपर्यंत रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. बहुतेक गाड्यांनी तीन ते साडेतीन तासांचा विलंब लागत होता. त्यातच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळ घाटात रेल्वेमार्गावर दरड कोसळली. त्यामुळे पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक बंद करावी लागली. परिणामी बहुतेक गाड्या कल्याणहून नाशिक मार्गाने वळविल्या. कसारा घाट परिसरातही जोरदार पावसाने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे बहुतेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवल्या. मुंबईतून पुणे व नाशिककडे जाणारी रेल्वे वाहतूक शनिवारी रात्रीपासून खोळंबली.रविवारीही त्यामध्ये फारसा फरक पडला नाही. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या. तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे, नाशिक किंवा इगतपुरीपर्यंतच धावत होत्या. तसेच कसारा घाटात रेल्वेमार्गावर सातत्याने गाळ येत होता. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.मिरजेत थांबविल्या गाड्यामिरज (जि. सांगली) : कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाजवळ धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी आल्याने मिरज-कोल्हापूरदरम्यान होणारी रेल्वे वाहतूक रविवारी दुपारपासून बंद झाली आहे. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कोल्हापूरकडे जाणाºया सर्व गाड्या मिरजेत थांबविण्यात आल्या आहेत. पूरस्थितीमुळे रविवारी दुपारी १.५० वाजताची मिरज - कोल्हापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली. गोंदिया-कोल्हापूर महाराष्टÑ एक्स्प्रेस हातकणंगलेपर्यंत सोडण्यात आली.कोकण रेल्वे ठप्परत्नागिरी : अतिमुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्या इतर मार्गांवरून वळवल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली. मात्र त्यानंतर दरड बाजूला केली असली तरी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईत असलेल्या जोरदार पावसामुळे वाहतूक बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.गोव्यात पावसाचा कहरपणजी : मुसळधार पावसाने रविवारीही राज्याला झोडपले. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचा पुरवठा खंडित झाला. मुंबईला जाणाºया बससेवेवर गंभीर परिणाम झालेला आहे. काही बसेस रद्द कराव्या लागलेल्या आहेत. कोकण रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे, अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. राज्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही ठिकाणी छोटे बंधारे फुटून पाणी वाहिले. धरणेही भरलेली असून विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारादिलेला आहे. समुद्राला उधाण आल्याचे चित्र किनारपट्टीत आहे. राजधानी पणजी आणि परिसरातील रस्त्यांची चाळण झालेली आहे. काही ठिकाणांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. मांडवी नदीचे पाणी घुसल्याने चोडण बेटावरील रस्त्याव्त्र पाणी आले आहे. डिचोली तालुक्यातील साळ गावाला पुराचा विळखा पडलेला आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव शहरात पडझडीच्या २५ घटना घडल्या.
रेल्वे ठप्प, प्रवाशांचे मेगाहाल; मंकी हिलजवळ कोसळली दरड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 3:58 AM