पुणे : रेल्वे परिसर, स्थानक तसेच गाड्यांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने ‘छायाचित्र काढा, बक्षीस जिंका’ ही नवी योजना सुरू केली आहे. मुंबईमध्ये ही योजना सुरू करण्यात आली असून, लवकरच अन्य स्थानकांत ती सुरू केली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी दिली.रेल्वेच्या पुणे विभागातील काही स्थानकांना भेट दिल्यानंतर सूद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पुणे विभागाचे व्यवस्थापक सुनीत शर्मा उपस्थित होते. सूद म्हणाले, ‘‘रेल्वे परिसर तसेच गाड्यांमध्ये सोनसाखळी, मोबाईल, पर्स चोरी तसेच अन्य गैरप्रकार होत असतात. ते रोखण्यासाठी तसेच अशा गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी रेल्वे सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत प्राथमिक स्तरावर ‘छायाचित्र काढा, बक्षीस जिंका’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याचे किंवा घटनेचे छायाचित्र रेल्वेकडे देणाऱ्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच, महिलांची छेड किंवा मारहाण करतानाचे छायाचित्र देणाऱ्यांना ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. मुंबईनंंतर इतर स्थानकांवर टप्प्याटप्प्याने ही योजना सुरू केली जाईल.’’रेल्वे फाटकांवर कोणीही नसल्याने काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने फाटकांवर ‘गेट मित्र’ तैनात केले आहेत. हे गेट मित्र स्थानिक गावांतील असून, रेल्वे येण्याच्या वेळेत ये-जा करणाऱ्यांना रोखून त्यांचे समुपदेशन करीत आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी त्याचा फायदा होत आहे, असे सूद यांनी सांगितले.(प्रतिनिधी)च्पुणे रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे इतर ठिकाणी आणखी एक टर्मिनल उभारण्याची मागणी काही वर्षांपासून होत आहे. त्यासाठी रेल्वेने हडपसर येथील जागाही निश्चित केली आहे. मात्र, ही जागा खासगी तसेच शासनाची असल्याने ती मिळविण्यात अनेक अडचणी येत आहेत, अशी माहिती सुनीलकुमार सूद यांनी दिली. त्यामुळे सध्या तरी प्रवाशांना नवीन रेल्वे टर्मिनलसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेची शक्कल
By admin | Published: December 20, 2014 11:54 PM