भिगवण : चाळीस वर्षांपासून अविरतपणे भिगवणरेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांचा थांबा येत्या १ जुलैपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यावर भिगवण परिसरातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून हा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा रेले रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भिगवण रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष रामहरी चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी संघाची दुगार्माता मंदिरात बैठक झाली. त्यानंतर विविध मागण्यांबाबतचे निवेदन विभागीय रेल्वे प्रबंधक यांना दिले. या वेळी चोपडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, की ४० वर्षांपासून हैदराबाद, मुंबई आणि मुंबई चिनी या गाड्यांचा थांबा भिगवण येथे आहे. या दोन गाड्यांच्या थांब्यामुळे भिगवण आणि परिसरातील ४० गावांतील नागरिक आणि प्रवासी आपल्या कामासाठी या गाड्यांचा उपयोग करत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रवाशांना अंधारात ठेवून रेल्वे विभागाने गावांचा थांबा रद्द करण्याचा घाट घातला आहे.
हा थांबा रद्द झाल्यास अनेक प्रवाशांना त्यांच्या शासकीय कामकाज, उपचार आणि नोकरीधंद्यासाठी पुणे आणि मुंबई तसेच राज्यातील अनेक शहरांना जाण्याचा पर्याय बंद होणार आहे...........भिगवण शहराची तालुक्याच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणून ओळख बनत असताना थांबा बंद झाल्यास अन्यायकारक होईल. त्यामुळे रेल्वे विभागाने तातडीने आपला निर्णय बदलावा, नाही तर रेल रोकोसारख्या तीव्र आंदोलनाला सुरुवात करावी लागणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले..........तसेच, प्रवासी मंडळ गेले अनेक वर्षे मागणी करीत असलेल्या दोन गाड्यांच्या वाढीव थांब्याचा तातडीने विचार करावा, असे निवेदन या वेळी देण्यात आले.
१ जुलैपासून हा थांबा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्रवासी संघाला मिळाली. त्यामुळे प्रवासी संघ आणि परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी तयार करण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती खासदार सुप्रिया सुळे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री व महाप्रबंधक यांना देण्यात आल्या. तर, यावर तातडीने निर्णय न झाल्यास याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ................पुणे-दौंड प्रवासी चाकरमान्यांची गैरसोयसकाळी अनेक चाकरमाने आपल्या नोकरीसाठी या रेल्वेगाडीने पुण्याला जातात, तर संध्याकाळी याच गाडीचा वापर करून परतत असतात. तर, व्यापारी वर्गासाठी पर्वणी असणाऱ्या या गाडीचा थांबा बंद झाल्यास अनेक समस्या निर्माण होणार असून पुणे-सोलापूर महामार्गावर त्याचा ताण वाढेल. यामुळे रस्ते अपघातात वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.