कळस (पुणे) : कोरोना काळापासून भिगवण रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला असून तो पूर्ववत करण्यासाठी मंगळवार (दि. २७) रोजी भिगवण आणि परिसरातील प्रवासी, नागरिकांच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बंगलोर- दिल्ली ३० मिनिटे रोखून थांबण्यात आली होती. स्टेशन प्रबंधक फारुख शेख यांनी मागणी वरीष्ठ विभागाला कळवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यापूर्वी थांबत असलेल्या हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एक्सप्रेस, सिद्धेश्वर, विजापूर या प्रमुख गाड्यांच्या थांबा सुरु करून हुतात्मा एक्सप्रेस, पुणे-लातूर (हरंगुळ), पुणे - अमरावती, उद्यान एक्सप्रेस या गाड्यांना देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी कर्मयोगी कारखाना संचालक पराग जाधव, भिगवणच्या सरपंच दीपिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, राजेगाव सरपंच माउली लोंढे, तानाजी वायसे, सचिन बोगावत, प्रदीप वाकसे, सुरेश बिबे, जावेद शेख, गोरख पोंदकुले, कपिल भाकरे, आदी सर्वपक्षीय नेतेमंडळी, प्रवासी, रिक्षा चालक, माथाडी कामगावर आसपासच्या गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
पुणे, नगर, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील भिगवण हे रेल्वे स्थानक मध्यवर्ती ठिकाण असून या स्थानकावर कोरोना लॉकडाउन पासून येथील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला. त्यामुळे भिगवण येथून शासकीय तसेच शैक्षणिक, औद्योगिक नोकरीसाठी कामानिमित्त पुणे, सोलापूर आदी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठा खोळंबा होत आहे. भिगवण हे पर्यटनासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. रेल्वे गाडयांना थांबा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
एक्सप्रेस गाड्यांचा थांब्यासाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले असून एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्यात न आल्यास यापेक्षा पुन्हा मोठे आंदोलन केले जाईल.
- माऊली लोंढे (सरपंच राजेगाव)
विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे थांबा पूर्ववत होण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनालाही वारंवार रेल्वे थांबा पूर्ववत सुरू करण्याबाबत पाठपुरावा केला होता परंतु रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलनाची वेळ आली. यामुळे रेल्वे थांबा पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे.
- दीपिका क्षीरसागर (सरपंच भिगवण)