--
दौंड : दौंडची तिसरी अद्ययावत रेल्वे कुरकुंभ मोरी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत रेल्वे प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
सुप्रिया सुळे यांनी नुकतीच तिसऱ्या रेल्वे कुरकुंभ मोरीची पाहणी केली. या वेळी रेल्वेचे वरिष्ठ अभियंता सुरेंद्र कौरव, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे, आप्पासाहेब पवार, उपनगराध्यक्ष विलास शितोळे, हेमलता फडके, विकास कदम, प्रवीण शिंदे, योगीनी दिवेकर, बादशाह शेख, गुरुमुख नारंग, राजेंद्र उगले आदी उपस्थित होते.
१८ जून २०२१ रोजी सुप्रिया सुळे यांनी दौंडच्या रेल्वे कुरकुंभ मोरीची पाहणी केली होती. त्या वेळेस रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले होते की, कुठल्याही परिस्थितीत डिसेंबर महिन्यात रेल्वे कुरकुंभ मोरी वाहतुकीसाठी सुरू होईल. मात्र, त्यानंतर दोन महिने उलटले तरी कुरकुंभ मोरीच्या कामात प्रगती नसून काम आहे तसेच ठप्प आहे. त्यामुळे सुळे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी केली व रेल्वेचे वरिष्ठ अभियंता सुरेंद्र कौरव यांना याबाबत सूचना केल्या.
यावेळी कंत्राटदार राजेंद्र उगले म्हणाले की, रेल्वेने सर्वतोपरी सहकार्य केले तर डिसेंबरला ही मोरी कार्यरत होईल साधारणत: मोरीच्या पुशिंग बॉक्सच्या कामाला दोन महिने लागेल. कारण दररोज पाच मीटर मोरीचा बॉक्स पुशिंग होऊन आत जाणार आहे यासाठी रेल्वेने नियोजन केले तर कामगारांना काम करता येईल. असे शेवटी उगले म्हणाले. एकंदरीतच सर्व परिस्थिती पाहता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, १५ ऑक्टोबरला तुम्ही मोरीच काम सुरू करा, मी २५ ऑक्टोबरला येऊन काम सुरू झाले की नाही याची पडताळणी करणार आहे. मात्र, कुठल्याही परिस्थितीत दिरंगाई न करता रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम झाले पाहिजे. कारण हा तालुक्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
--
फोटो क्रमांक : १६ दौंड रेल्वे पाहणी सुळे
फोटो : दौंड येथे रेल्वे कुरकुंभ मोरी चे कामकाज पाहताना खासदार सुप्रिया सुळे सोबत रेल्वे अधिकारी.