पुणे : पुणे रेल्वेस्थानकात लोकलसाठी स्वतंत्र टर्मिनल, पुणे स्टेशनप्रमाणेच जवळच नवे टर्मिनल विकसित करणे, हेरिटेज स्टेशन अशा वेगवेगळ्या घोषणा रेल्वे प्रशासानकडून वेळोवेळी केल्या. मात्र, त्यातील एकही घोषणा अद्याप प्रत्यक्षात आली असून, काही घोषणापासून तर रेल्वेने यूटर्न घेतल्याचे दिसून येते़ एका बाजूला भाडेवाढ करताना रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये घट होताना दिसत आहे़ पुण्यासह राज्यातील २८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मात्र, पुण्याला रेल्वे प्रशासनाकडून कायमच सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. पुणे रेल्वेस्थानकात लोकलसाठी स्वतंत्र टर्मिनलसाठी जागा निश्चित झाल्याची घोषणा तत्कालीन मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापिका सौम्या राघवन यांनी मार्च २००८ मध्ये केली होती़ पुणे रेल्वेस्थानकाला हेरिटेज स्थानक म्हणून दर्जा देण्यात आला आहे़ रेल्वेस्थानकाच्या उत्तरेच्या बाजूला पेट्रोलियम कंपन्यांच्या ताब्यातील जागा रेल्वेला मिळाली असून, तेथे टर्मिनल होणार असून, त्याचा मास्टर प्लॅन तयार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, हा मास्टर प्लॅन प्रत्यक्षात अद्याप आलाच नाही. आता तर तो प्रस्तावच बासनात गुंडाळून ठेवल्याचे दिसून येत आहे़ त्यावर कोणीही काहीही बोलत नाही़ पुण्यातील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही त्याप्रमाणात सोयीसुविधांमध्ये वाढ होत नाही़ एका बाजूला देशातील सर्वाधिक ई-टिकिटिंग पुण्यातून होते़ दर वर्षी गाड्या वाढत गेल्या़ आज पुणे स्टेशनवरून जवळपास २५० गाड्या जातात़ त्यांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागते़ विद्युतीकरण रखडलेपुणे : दौंडदरम्यान रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण डिसेंबर २०१३ पर्यंत पूर्ण होणार होणार होते़ मात्र, जागतिक बँकेकडून निधी मिळण्यास उशीर झाल्याने सुरुवातीला हे काम लवकर सुरू झाले नाही़ काम सुरू झाल्यावर ते अतिशय मंदगतीने होत आहे़ विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर आता टॉवर उभारण्याबाबत अडथळा आला आहे़ गेल्या डिसेंबरपासून लोणावळा ते दौंडदरम्यान लोकल सेवा सुरू होण्याचे जे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून मिळाले होते़ या डिसेंबरपर्यंतही सुरू होईल की नाही, हे कोणीही सांगू शकत नाही़ पुणे विभागात ७१ स्टेशन आहेत़ त्यातील अनेक रेल्वे स्टेशनवर सोयीसुविधांची वानवा आहे़ रेल्वे स्टेशनच्या सुधारणेसाठी अतिशय तुटपुंजी रक्कम पुणे विभागाच्या वाट्याला येत असल्याने कोणत्याही ठळक सुधारणा झाल्याचे दिसत नाही़ तब्बल १५ वर्षांनंतरही पुणे झोन सक्षम नाही मध्य रेल्वेच्या अंतर्गत पुणे विभागाची स्थापना होऊन आता १५ वर्षे झाली आहेत़ पण, अजूनही हा विभाग सक्षम झालेला नाही़ मुंबई झोनमध्ये हा विभाग येतो़ मुंबईच्या रेल्वे अधिकाऱ्यांची मुंबईतील रेल्वे सुविधा आणि लोकल याकडे लक्ष देण्यात सर्व शक्ती निघून जाते़ त्यामुळे कर्जतपुढे लक्ष देण्यास त्यांना वेळच मिळत नाही़ त्यामुळे पुणे झोन करावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून होत आहे़ महसुलाच्या तुलनेत सुविधा मिळाव्यातरेल्वेमंत्री ज्या प्रदेशाचा, त्या प्रदेशाला रेल्वे अर्थसंकल्पात झुकते माप देण्याच्या वृत्तीमुळे देशातील अन्य विभागांमध्ये सोयीसुविधा कमी पडत आहे़ पुणे विभागातून प्रवासी व माल वाहतुकीमधून रेल्वेला चांगला महसूल मिळतो़ पण, त्याप्रमाणात येथील सोयीसुविधांवर खर्च होत नाही़ विभागातून मिळणाऱ्या महसुलानुसार त्या-त्या विभागाला सोयीसुविधा मिळाव्यात, अशी मागणी होताना दिसत आहे़
पुण्यासाठी रेल्वेच्या नुसत्याच घोषणा!
By admin | Published: July 17, 2015 4:01 AM