पुणे : अधिक सुखकर आणि स्वस्तात हाेणारा प्रवास म्हणून बहुतांश नागरिक रेल्वेने प्रवास करण्याला पसंती देतात. दिवाळीत तर सर्वाधिक गर्दी हाेत असते. मात्र, रेल्वेने ऐन दिवाळीत रूळ दुहेरीकरणाची कामे सुरू करून अनेक रेल्वे रद्द केल्या, काहींचे मार्ग बदलले. त्यामुळे तब्बल तीन महिने आधीपासून रेल्वे बुकिंग केलेल्या प्रवाशांच्या आनंदावर तीन मिनिटांत रेल्वे रद्दचा निर्णय घेऊन पाणी फेरले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
खासगी बस चालकांनी तिकिटांचा दर चारपट वाढवून ठेवल्याने आणि रेल्वे अचानक रद्द होत असल्याने दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. मंगळवारी दिल्लीहून वास्को-द-गामा (गोवा) जाणारी निझामुद्दीन एक्स्प्रेस १२ तास अहमदनगर रेल्वे स्थानकावर उभी होती. त्यानंतर पुण्याला रेल्वे न नेता थेट सोलापूरला जाईल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्यावर रेल्वे पुणे स्टेशनवर आली.
ऐन दिवाळीत अनेक रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना ऐनवेळी अधिक पैसे देऊन दुसऱ्या वाहनाने प्रवास करावा लागला. त्यामुळे कन्फर्म रेल्वे तिकीट मिळावे यासाठी तीन महिने आधी तिकीट काढलेल्या प्रवाशांची रेल्वे तीन मिनिटांत रद्द होत असल्याने, रेल्वे प्रशासनाने ऐन दिवाळीत काम सुरू केल्याने खासगी बस चालकांशी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काही साटेलोटे केले की काय, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
खासदारांचेच ऐकत नसतील तर आमचं काय?
रेल्वे प्रशासन आणि खासदार यांची पुण्यातील डीआरएम कार्यालयात बैठक झाली. तेव्हा तब्बल नऊ खासदारांनी दरवेळी फक्त चर्चाच होते, कृतीत रेल्वे प्रशासन काहीच आणत नाही, असा आराेप केला. आमच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले जात नसेल तर आम्हालाही बैठकीत सहभागी होण्यासाठी रस नाही, असे सांगत बैठकीतून माघार घेतली हाेती. रेल्वे प्रशासन खासदारांचेच ऐकत नसेल तर आम्हा सर्वसामान्यांचे कसे ऐकेल, असा संतप्त सवाल देखील प्रवासी वर्गामधून येत आहे.
प्रशासन करतेय काय?
दिवाळी काही दिवसांवर आलेली असताना रेल्वेने एकही दिवाळी विशेष रेल्वे वारंवार मागणी करूनही सुरू केल्या नाहीत. रेल्वे प्रशासन नेमके काय काम करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रवासी म्हणतात...
- आम्हाला ऐनवेळी रेल्वे रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते पैसे अडकून पडले आणि खासगी बसला जादा पैसे देऊन गावी जाण्याची वेळ आली.
- पुणे स्टेशनवर अचानक रेल्वेचा प्लॅटफॉर्म बदलला जात आहे. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याची कोणतीही माहिती दिली जात नाही.
- रेल्वे स्टेशनवरील सरकता जीना देखील गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने महिला आणि ज्येष्ठांचे हाल होत आहेत.