पिंपरी : दोन दिवसांवर दिवाळी आल्याने मूळ गावी जाण्यासाठी नोकरदार वर्ग व चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड रेल्वे स्टेशन व वल्लभनगर बस स्थानक हाऊसफुल्ल झाले आहे. स्थानकावर गाडी येताच जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत असल्याचे चित्र मंगळवारी पहायला मिळाले. त्यामुळे प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सकडे जावे लागत असून, त्यांच्याकडून जादा दराने भाडे आकारणी सुरू आहे.रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळातर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी लांब पल्ल्यासाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या गाड्यांची आरक्षणाची आगाऊ नोंदणी पूर्ण झाली आहे. शिवाय नियमित धावणाऱ्या गाड्यांचेदेखील बहुतांश नागरिकांनी तीन ते चार महिन्यांआधीच आरक्षण करून ठेवल्यामुळे, बहुतांश प्रवाशांचे आरक्षण प्रतीक्षेत आहे. यामध्ये दिवसा आणि रात्रीच्या गाड्यांचेदेखील आरक्षण फुल्ल झाले आहे. मात्र, दिवाळीसाठी गावी जाणे गरजेचे असल्याने, चाकरमानी गर्दीतदेखील गावी जाताना दिसून येत आहेत. कमी भाडे असलेल्या पॅसेंजर गाडीत तर उभे राहण्यासाठीदेखील जागा नाही. चिंचवड रेल्वे स्टेशनवर नाशिक, जळगावकडे जाणारी हुतात्मा एक्सप्रेस येताच गाडीत जागा मिळण्यासाठी काही प्रवासी जीव धोक्यात घालून धावती गाडी पकडताना दिसून आले. काही प्रवासी खिडकीतून रुमाल टाकून जागा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच एसटी महामंडळातर्फे दिवाळीसाठी २६ ते ३० आॅक्टोबर दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या असून, प्रवाशासांठी आॅनलाइन तिकीट आरक्षणाचीदेखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच प्रवाशांना सवलतीच्या दरात चार दिवसांपासून ते सात दिवसांचीदेखील पास सुविधा उपलब्ध करुन दिली. (प्रतिनिधी)पासची जोरदार विक्री...साध्या बससाठी चार दिवसांचा पास ८१० रुपये, सात दिवसांचा १४३५ रुपये आहे. तर निमआराम बससाठी चार दिवसांचा पास ९३५ रुपये, सात दिवसांचा १६३५ रुपये आहे. तसेच आंतरराज्य प्रवासासाठी चार दिवसांचा सवलतीचा पास १ हजार १० रुपये, तर सात दिवसांचा १७३५ रुपये आहे. या पासेससाठी वल्लभनगर आगारात स्वतंत्र खिडकी देखील उपलब्ध आहे.त्याठिकाणीही प्रवाशांनी गर्दी केली होती.ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे...रेल्वेचे आरक्षण प्रतिक्षेत असल्यामुळे बहुतांश प्रवासी लांब पल्ल्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सला प्राधान्य देताना दिसून येत आहे. वाढत्या गर्दीचा फायदा घेत काही ट्रॅव्हल्स मालकानीदेखील ट्रॅव्हल्सच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये नाशिक, नागपूर, वर्धा, भंडारा, सोलापूर, धुळे, जळगाव या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने, ट्रॅव्हल्स चालकांकडून जादा दराने भाडे आकारणी केली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दिवाळीनिमित्त गावाकडे जाण्यासाठी सर्वच रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे. लवकर आरक्षण निश्चित होत नसल्यामुळे, रेल्वेने प्रवास न करता ट्रॅव्हल्सने मनमाडला जावे लागत आहे. मागील आठवड्यांत मनमाडचे भाडे साडेतीनशे तीनशे रुपये होते.आता मात्र, चारशेरुपये झाले आहे. - नयन वडनेरे, प्रवासी रेल्वेला भाडे कमी आणि सुरक्षित प्रवास होत असल्यामुळे दरवर्षी जळगावला पॅसेंजरने जात असतो. परंतू मागील आठ दिवसांपासून खुपच गर्दी असल्याने, ट्रव्हल्सने जादा पैसे मोजून गावाला जावे लागते. रेल्वे प्रशासनाने विशेषगाड्या सोडायला पाहिजे. - पंकज डोलारे, प्रवासी
रेल्वे, बस हाऊसफुल्ल!
By admin | Published: October 26, 2016 5:56 AM