आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी हद्दीतून जाणाऱ्या पुणे- नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पकरिता मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या समस्याचे निराकरण लेखी स्वरूपात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा देत निघोटवाडी येथील शेतकऱ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना निवेदन दिले आहे.
यावेळी निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, राजाराम निघोट, सुमंता निघोट, अशोक अण्णा निघोट, धनंजय निघोट, सुभाष निघोट, दिलीप बाणखेले, सनद निघोट व शेतकरी उपस्थित होते. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आंबेगाव तालुक्यातून तांबडेमळा, निघोटवाडी, वडगाव काशिंबेग अशी जाणार आहे. या रेल्वेसाठी मोजणीचे काम सुरू असून त्याला आता विरोध होऊ लागला आहे. निघोटवाडी ग्रामस्थांनी मोजणीला विरोध केला आहे. यासंदर्भात उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांनी डिंभा कालवा, डिंभे धरण पुनर्वसन, डिंभे कुकडी कॉलनी, मंचर-भीमाशंकर रस्ता, मंचर वडगाव काशिंबेग रस्ता, मंचर-सुलतानपूर रस्ता, तसेच खेड-सिन्नर बायपास रस्ता या सर्व प्रकल्पांकरीता मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या. यामुळे सर्व शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. रेल्वे प्रकल्प निघोटवाडी हद्दीव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून घेण्यात यावा, निघोटवाडी परीसरातील सर्व शेतजमिनी बागायती असून सर्व शेतकरी व त्यांची कुटुंबे शेती व शेतीपूरक व्यवसाय मुख्यत्वे दुग्धव्यवसाय करून आपली उपजीविका करत आहेत. शेतकरी अल्पभूधारक असून रेल्वेमुळे जमिनीचे तुकडे झाल्यास १ ते २ गुंठे जमीन शेती शिल्लक राहणार आहेत. उर्वरित अल्प जमिनीतून कशाप्रकारे उपजीविका करावयाची किंवा शेती कशी करायची? हा प्रश्न निर्माण होणार आहे. या पूर्वी खेड-सिन्नर मंचर बायपास रस्त्यासाठी शेतजमिनी संपादित करताना दिलेला भाव हा अत्यल्प होता. यात गेलेले क्षेत्र हे प्रभावी क्षेत्र असून आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व यापुढेही चालणारा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. संपादित शेतकऱ्यांचे जमिनींना सर्वात कमी बाजारभाव दिल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे या मोबदल्यातून आताच्या व पुढच्या येणाऱ्या पिढीचा उदरनिर्वाह कसा चालणार? हातातील जमीन गेली, गेलेल्या जमिनीस अल्प दराने मोबदला दिला गेला. याचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.
चौकट
संपादित करताना दिलेला भाव हा अत्यल्प होता. हे क्षेत्र हे प्रभावी क्षेत्र असून आमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व यापुढेही चालणारा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. संपादित शेतकऱ्यांचे जमिनींना सर्वात कमी बाजारभाव दिल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्या मोबदल्यातून आताच्या व पुढच्या येणाऱ्या पिढीचा उदरनिर्वाह कसा चालणार? हातातील जमीन गेली, गेलेल्या जमिनीस अल्प दराने मोबदला दिला गेला. याचा प्रामुख्याने विचार व्हावा, अशी मागणी बाधितांनी केली आहे.