पुणे : पुणे तिथे काय उणे या उक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. रेल्वेचे इंजिन थेट जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर आल्याने बुधवारी काहीकाळ वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली हाेती. सुदैवाने कुठलिही दुर्घटना घडली नाही. परंतु इंजिन रस्त्यावर येत असताना कुठलाही कर्मचारी वाहतुक थांबविण्यासाठी न आल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा समाेर आला आहे.
पुण्यात खडकी भागात दारुगाेळा निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात सामानाची ने आण करण्यासाठी खडकीरेल्वे स्टेशनच्या जवळून एक रुळ दारुगाेळा कारखान्यात जाताे. जेव्हा रेल्वे कारखान्यात जात असे तेव्हा संरक्षण दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी थांबून वाहतूक थांबवित असत. काही वर्षांपासून या रुळाचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरुन वाहतूक विनाथांबा सुरु असते. गुरुवारी अचानक बाेपाेडी येथे बंद असलेल्या रुळावरच रेल्वे इंजिन आल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने यात कुठलिही अनुचित घटना घडली नाही.
खडकी रेल्वे स्टेशन येथे दुसऱ्या एका रेल्वेला मार्ग देण्यासाठी इंजिनला बाेपाेडी येथील महामार्गावर आणण्यात आले हाेते. इंजिनसाेबत काेणताही कर्मचारी रस्ता बंद करण्यास न आल्यामुळे वाहतूक सुरु असतानाच इंजिन रस्त्यावर आले. याप्रकरामुळे रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार समाेर आला आहे.