पुणे : हिवाळ्यात अनेकजण सुट्यांचा आनंद घेण्यासाठी हुबळी येथे गर्दी करतात. अशा प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते हुबळीदरम्यान चार विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून गाडी क्रमांक ०११७१ ही शनिवार (दि. ३) रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी रवाना होईल. तर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता हुबळी येथे पोहोचेल. तर हुबळी येथून गाडी क्रमांक ०११७२ ही रविवार (दि. ४) रोजी रात्री नऊ वाजून ३० मिनिटांनी सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, जेजुरी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, बेळगाव, लोंडा आणि धारवाड या ठिकाणावर रेल्वेला थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला एकूण १९ द्वितीय श्रेणी बोगी आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून गाडी क्रमांक ०११७३ ही शनिवार (दि. ३) रोजी दुपारी एक वाजून ३० मिनिटांनी रवाना होईल. तर दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजून २० मिनिटांनी हुबळी येथे पोहोचेल. तसेच हुबळी येथून गाडी क्रमांक ०११७४ ही रविवार (दि. ४) रोजी रात्री आठ वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पोहोचेल. या गाड्यांची बोगी संख्या १६ असून संपूर्ण द्वितीय श्रेणी आहेत. या विशेष रेल्वे गाड्या अनारक्षित धावणार असून एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या शुल्क प्रणालीने आपली तिकिटे निश्चित करावी, अशी माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली आहे.