नीरा (पुणे) : जेऊर - नीरा मार्गावर असणाऱ्या पिंपरे (खुर्द) हद्दीतील जेऊर फाटा (ता. पुरंदर) येथील असणारे रेल्वे गेट आज, सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत १२ तासांसाठी वाहतुकीला बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने रविवारी उशिरा देण्यात आली. या दरम्यान, नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा-जेऊर, मांडकी, वीर, सारोळा या मार्गावर मिरज-पुणे रेल्वे लाईनवरील जेऊर फाटा येथे रेल्वेचे २८ नंबर किलोमीटर ८० / ४-५ गेट आहे. हे गेट रेल्वे कामासाठी व निरीक्षणासाठी सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद राहणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मांडकी व जेऊर ग्रामपंचायतीला दिली. तसेच जेऊर, मांडकी, लपतळवाडी, वीर, सारोळा येथील नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले.
मागील आठवड्यात रेल्वेगेट ३६ तास बंद ठेवण्यात आले होते. यावेळी पुरंदर तालुक्यातील मांडकी, जेऊर, लपतळवाडी, वीर या ऊस बागायत पट्यातून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. यातच आता सलग ३६ तास वाहतूक बंद राहिल्यानंतर पुन्हा एकदा १२ तास ऊस वाहतूक बंद राहणार असल्याने, या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने येथील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत आहेत.