नीरा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पिसुर्टी येथील रेल्वेगेट सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून बुधवारी सकाळी सात पर्यंत रेल्वेच्या कामासंदर्भात बंद राहणार होते. याची बातमी दैनिक लोकमतने रविवारी प्रसिद्ध करून ऐन सणासुदीच्या काळात हा रस्ता बंद होणार असल्याने लोकांची व्यथा मांडली होती. याची दखल स्थानिक प्रशासनाने घेत परवाणगी नकारल्याने हे काम आज रद्द झाले असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दै. लोकमतला दिली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा ४०किलोमीटरचा वळसा टळला आहे.
मागील सहा महिन्यात हा रस्ता पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामुळे पिसुर्टी येथील २७ नंबरचे गेट पाच वेळा बंद ठेवण्यात आला होता. पंढरपूरच्या एकादशीच्या आधी दोन दिवस तसेच गणेशोत्सवा आधी दोन दिवस बंद ठेवल्याने प्रवाशांना चाळीस किलोमीटरचा वळसा घालून यावे जावे लागत होते. यावेळीही रेल्वे प्रशासनाने पुन्हा दसऱ्याचा मुहूर्त साधून दसऱ्याआधी दोन दिवस पालखी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दैनिक लोकमतने रविवारी याबाबत सडेतोड वृत्त दिल्याने स्थानिक प्रशासनाने रेल्वेला हे काम करण्यास परवानगी न दिल्याने, आज सोमवारी सकाळी सात पासून सुरू होणारे काम सुरू न करता पुढील काळात या कामाचे नियोजन केल्याचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.
या पालखी महामार्गावरून नवरात्रीच्या या तीन दिवसांत पुणे, मुंबई, नाशिक व राज्यभरातून चाकरमानी आपल्या मुळगावी दसरा सण साजरा करण्यासाठी जात असतात. मात्र जेजुरी ते नीरा दरम्यानचा पालखी मार्ग रेल्वेने बंद ठेवल्याने या प्रवाशांना मोठा वळसा घालून जावे लागणार होते. जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा नीरा येथे युऊन पुढिल प्रवास करावा लागणार होता. त्यासाठी तब्बल ४० किलोमीटरचा वळसा या मार्गावरील प्रवाशांना पडणार होता, तो आता टळल्याने स्थानाकांसस प्रवाशांनी लोकमतचे आभार मानले.