पुणे: भारतीय रेल्वे १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशातील विविध विभागात ''स्वच्छता पंधरवडा '' साजरा करीत आहे. या दरम्यान रेल्वे स्थानक, गाड्या, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, रुग्णालये आदी ठिकाणी या पंधरा दिवसांत स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. प्रवाशांनी स्थानकावर व रेल्वेत स्वच्छता राखावी, याकरिता त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. पुणे विभागात मोठ्या उत्साहात याची सुरुवात झाली.
मध्य रेल्वेने या पंधरवड्या दरम्यान गृहराज्य मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड -१९ संबंधित सर्व खबरदारी/प्रोटोकॉल व मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत विविध उपक्रम राबविले जात आहे. या स्वच्छता अभियानात मुख्यालय व सर्व विभागीय स्तरावर स्वच्छता जागृतीसाठी आपापल्या कामाच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ देण्यापासून सुरू झाली. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणु शर्मा यांची उपस्थिती होती.
शनिवारी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीलम चंद्रा व प्रकाश उपाध्याय यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक विजयसिंह दडस यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेत स्वच्छता मोहीम राबवली गेली. यात झेलम, इंद्रायणी व नागपूर एक्स्प्रेसच्या रेकचा समावेश होता.