पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मार्गाचे मोजणीचे काम सुरू झाले आहे. होलेवाडी, मांजरेवाडी, टाकळकरवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या बागाईती शेतातून रेल्वेमार्ग जाणार आहे. बागाईती व तुंटपुजी असलेली शेतजमीन जाणार म्हणून शेतकरी हतबल झाला. जमीन थेट खरेदी पद्धतीमध्ये जमीन मालकाची परवानगी असल्याशिवाय सर्वेक्षण होऊ शकत नाही. या रेल्वे प्रकल्पाला आमचा विरोध असून, आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भूसंपादनाला सहमती नसल्याने भूसंपादन मोजणीची प्रक्रिया थांबविण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रांत यांना निवेदन देण्यात आले होते. तरीही मोजणीसाठी प्रशासन आल्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. चार दिवसांपूर्वी शेतकरी रेल्वे अधिकारी व खेड प्रशासन यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना समर्पक अशी उत्तरे या बैठकीत मिळाली नाही. रेल्वे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही. रेल्वेसाठी किती भूसंपादन करणार, बागाईती जमिनीला किती भाव देणार, रेड झोन किती असणार आदी प्रश्न शेतकऱ्यांनी बैठकादरम्यान प्रशासनाला विचारले होते. मात्र यांचे उत्तर प्रशासनाला देता आले नाही. त्या वेळीच शेतकऱ्यांनी निर्धार केला की, आधी या प्रश्नांची उत्तरे द्या. मगच मोजणी करा. दि २४ रोजी होणाऱ्या मोजणीला विरोध दर्शवून तसेच मोजणी करू नये असे निवेदन देऊनही होलेवाडी, मांजरेवाडी या परिसरात रेल्वे मार्गाची मोजणी करण्यासाठी आज सकाळी १० वाजता रेल्वे अधिकारी, मोजणी कर्मचारी आले होते. मोजणी करण्यास त्यांनी सुरवात केली होती. यांची कुणकुण शेतकऱ्यांना लागताच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोजणी कर्मचारी यांना घेराव घालून पुन्हा जर येथे पुन्हा याल तर याद राखा, अशी तंबी देऊन रेल्वे अधिकारी व मोजणी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले. प्रशासन शेतकऱ्याची फसवणूक करून रेल्वे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या जमिनीतून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला आमचा विरोध असून या प्रकल्पासाठी आम्ही कवडीमोल भावाने जमीन देणार नाही, असे येथील शेतकऱ्यांनी या वेळी स्पष्ट सांगितले. यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, माजी उपसरपंच अर्जुन मांजरे, जयसिंग मांजरे, एकनाथ मांजरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मांजरे, युवराज मांजरे, बबनराव मांजरे, महादू होले, रोहिदास टाकळकर, चंद्रकांत टाकळकर, योगेश मांजरे,अमोल होले ,सुभाष मांजरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळ: होलेवाडी (ता. खेड) येथे रेल्वे मार्ग मोजणीला विरोध करण्यासाठी जमलेले शेतकरी.