पुणे - रेल्वे व मेट्रोच्या डब्यांची निर्मिती करणारा कारखाना लातूरसह महाराष्ट्रच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या कारखान्यामुळे रोजगारनिर्मितीसह लातूरचा वेगाने विकास होणार आहे. पुढील दीड ते दोन वर्षांत प्रत्यक्ष डब्यांची निर्मिती सुरू होणार असल्याची माहिती कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर (एमसीसीआयए) तर्फे आयोजित ‘मेट्रो व रेल्वेशी संबंधित महापरिषदे’मध्ये ते बोलत होते. या वेळी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अगरवाल, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. किरण गित्ते, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते. निलंगेकर म्हणाले, लातूर येथील कोच फॅक्टरीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठीची जमीनही ताब्यात घेण्यात आली आहे. पुढील दीड-दोन वर्षांत प्रत्यक्ष डब्यांच्या निर्मितीचे काम सुरू होईल. महाराष्ट्रासह देशभरात रेल्वे तसेच मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वेचे डबे भारतातच निर्माण केले जातात. पण मेट्रोसाठी अन्य देशांवर अवलंबून राहावे लागते. लातूर येथील कारखान्यामुळे देशातच मेट्रोचे डबे तयार होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. तसेच विकासालाही चालना मिळणार आहे. अगरवाल म्हणाले, लातूर येथील प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा देशातील रेल्वे व मेट्रोचे डबे बनविणारा पहिला कारखाना असेल. या कारखान्यामुळे लातूरसह लगतच्या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. उत्तर प्रदेशात सुरू झालेल्याकारखान्यामुळे तेथील परिसराचा विकास झाला आहे.लोकल डब्याचे रूपडे पालटणारपुणे व लोणावळादरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांच्या डब्यांचे रंगरूप बदलण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासही आनंददायी होईल. हे डबे अद्ययावत करून वातानुकूलित करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत लवकरच असे डबे धावतील. त्याचप्रमाणे पुण्याबाबतही नियोजन सुरू आहे. ही लोकल सेवा दौंडपर्यंत वाढविण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अगरवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी मध्य रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर उपस्थित होते.
रेल्वे प्रकल्पाने विकासाला चालना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 2:07 AM