पुणे :लोणावळा ते पुणे लोकल ही पुणे - मुंबई मार्गावर राहणाऱ्या अनेकांची जीवनवाहिनी आहे. परंतु सध्या पुणे - लोणावळा लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने, हजारो प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेकडून पुणे ते लोणावळा आणि लोणावळा ते पुणे अशा लोकलच्या फेऱ्यांसाठी जे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, त्यानुसार दर अर्ध्या ते पाऊण तासाने लोकल सुटणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही.
यासह लोकल वेळेवर न येणे, वेळेवर न सुटणे, अनेक ठिकाणी वेळेपेक्षा जास्त स्टॉपेज घेणे, दोन रेल्वेंमध्ये ठरवलेले वेळेपेक्षा दोन ते तीन तासांचा कालावधी असणे, असे त्रास दररोज सुरू आहे. लोकलचे वेळापत्रक कोलमडले की विद्यार्थ्यांच्या शाला-महाविद्यालयाचे वेळापत्रकदेखील कोलमडत आहे. चाकारमान्यांना उशिरा कार्यालयात गेल्याने हाफ डे लागत आहे. दरम्यान, वारंवार प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वे विभागाकडे तक्रारी करूनदेखील आजवर कोणतीही ठोस उपाययोजना रेल्वेकडून करण्यात आलेली नाही, अशी ओरड प्रवाशांमधून केली जात आहे.