पुणे : पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याच्या गेल्या अनेक वर्षापासून केवळ घोषणा होत आहेत. आता पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाकडून देशातील ९० स्थानकांचा पुनर्विकास करण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.त्यामध्ये पुण्यासह शिवाजीनगर स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाजीनगर स्थानकालाही वर्ल्ड क्लास करण्याचे २०१४ मध्येच जाहीर करण्यात आले होते. मात्र, या स्थानकांचा विकास अद्याप घोषणाबाजीतच अडकलेला आहे.रेल्वे मंत्रालयाकडून देशातील ६०० हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी देशातील ९० रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याची घोषणा केली आहे. या स्थानकांवर प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविणे, स्थानकांचे सौंदर्य खुलविणारे बदल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानकनिहाय झोन, समन्वय संस्थांची नेमणुक करण्यात आली आहे. यापैकी काही स्थानके प्रवाशांसाठी यात्रेकरूंसाठी महत्वाची असून त्याठिकाणी दररोज ४५ हजारांहून अधिक प्रवाशांची ये-जा असते. या ९० स्थानकांमध्ये महाराष्ट्रीतल पुण्यासह शिवाजीगर, लोणावळा, सोलापुर, इगतपुरी, वर्धा या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाजीनगर स्थानकाच्या पुर्नविकासाची जबाबदारी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनवर सोपविण्यात आली आहे. तर उर्वरित स्थानकांचा पुनर्विकास झोनल रेल्वेकडून केला जाईल. स्थानकांचा पुनर्विकास करताना स्थानिक संस्कृती, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे, इतिहास आदींचा समावेश केला जाणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाला ए वन स्थानकाचा दर्जा १२-१३ वर्षांपूर्वीच देण्यात आला आहे. तेव्हापासून हे स्थानक वर्ल्ड क्लास करण्याची घोषणा सातत्याने केली जात आहे. सध्या रेल्वे स्थानकावरून लोकलसह दररोज सुमारे २१८ गाड्यांची ये-जा होते. सुमारे एक लाख १० हजार प्रवासी प्रवास करतात. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील सहा स्थानकांचा विकास करण्याची घोषणा केली होती. तसेच शहरातील दुसरे महत्वाचे स्थानक असलेल्या शिवाजीनगरला वर्ल्ड क्लास करण्याच्या घोषणेलाही चार वर्ष उलटून गेली. मात्र, अद्याप दोन्ही स्थानकांच्या विकासाला गती मिळालेली नाही. पुणे स्थानकावर प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी प्रवासी व गाड्यांची संख्या, अपुरी जागा याचा विचार केल्यास हे प्रयत्न खुप तोकडे पडत आहेत. त्यामुळे दोन्ही स्थानकांचा लवकरात लवकर विकास होणे आवश्यक असल्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.----------
पुनर्विकासाच्या घोषणाबाजीत अडकली रेल्वे स्थानके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 9:28 PM
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढविणे,स्थानकांचे सौंदर्य खुलविणारे बदल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानकनिहाय झोन, समन्वय संस्थांची नेमणुक