पुणे :पुणे-लातूर या मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे. या गाड्यांना खूपच गर्दी असते. त्यामुळे पुणे ते लातूर दरम्यान रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार पुणे विभागाने पुणे ते लातूर दरम्यान गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला होता. त्यानुसार रेल्वे बोर्डाने पुणे ते हरंगुळ दरम्यान रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येत आहे.
पुणे ते हरंगुळ (लातूर) दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या नवरात्री, दिवाळी यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक वाढेल, त्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबर पासून ३१ डिसेंबरपर्यंत दररोज ही गाडी पुणे-हरंगुळ-पुणे अशी धावणार आहे. हरंगुळ हे लातूर जवळील रेल्वे स्थानक आहे. या विशेष गाडीला पुणे नांदेड एक्स्प्रेसचा रेक वापरला जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
अशी आहे गाडी सुटण्याची वेळ -
ही गाडी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पुण्याहून सुटेल. तर त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी गाडी हरंगुळला पोहोचेल. तसेच हरंगुळ येथून ही गाडी दुपारी तीन वाजता पुण्याच्या दिशेने सुटेल आणि त्याच दिवशी ती पुण्यात रात्री नऊ वाजता पोहोचेल. हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन आणि धाराशिव असे थांबे आहेत.