पुणे: लॉकडाऊनच्या काळात रद्द केलेल्या रेल्वे सुरू करण्यासाठी आता रेल्वे बोर्डाने प्रयत्न सुरू केले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर आता रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी पुन्हा अनलॉक होताना दिसून येत आहे. येत्या तीन ते चार दिवसांत देशात १०० ते १५० रेल्वे पुन्हा सुरू होत आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर, मध्य रेल्वेसह भारतीय रेल्वेने आपल्या बहुतांश विशेष रेल्वे गाड्याची सेवा रद्द केली होती. अगदी ठराविक गाड्याचा धावत होत्या. आता मात्र महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या गाड्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या गाड्या सुरू करायच्या, याबाबतचा निर्णय संबंधित झोनला देण्यात आला आहे.
पुणे - मुंबई इंटरसिटी सुरू होण्याचे संकेत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे - मुंबई इंटरसिटी सेवा मोठ्या प्रमाणात बाधित झाली. डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, इंद्रायणी, प्रगती या प्रमुख इंटरसिटी गाड्या रद्द करण्यात आल्या. आता ह्या गाड्या सुरू होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे स्थानकावरून डेक्कन एक्स्प्रेसचा रेक मुंबईला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत डेक्कन एक्स्प्रेस तसेच डेक्कन क्वीन रेल्वे सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ह्या गाड्या सुरू झाल्यावर पुणेकरांची मोठी सोय होणार आहे.
-------------------
लॉकडाऊनच्या काळात खंडित झालेली रेल्वे सेवा पुन्हा आम्ही सुरू करीत आहोत. त्या संबंधिचे नियोजन रेल्वे बोर्ड स्तरावर सुरू देखील आहे. तसेच कोणत्या गाड्या सुरू करायच्या आहेत त्याचे अधिकार संबंधित झोनला देखील देण्यात आले आहे.
-डी. जे. नारायण, अतिरिक्त महा संचालक, जनसंपर्क विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली