पुणे : पुणेरेल्वे विभागात एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २८ हजार १६७ लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी २९ लाख २२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ८ हजार ५८९ जणांना अनियमित प्रवासासाठी ५० लाख ६९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २०६ जणांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु राणी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांद्वारे करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येते की, त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो असे आवाहन देखील रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.